शिर्डी - राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या कॉग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना कोणीही विचारत नसून ते लाचारासारखे सत्तेत कसे सहभागी आहेत. याबद्दल आपल्या आश्चर्य वाटत असून प्रदेशाध्यक्षांना कोणी विचारत नाही, अशी टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात आणि कॉग्रेसवर केली आहे.
राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी शिडीर्तील विविध समस्या आणि व्यावसायिकांच्या अडचणी संदर्भात बैठकीसाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कॉग्रेस पक्षावर आणि प्रदेशाध्यक्षांवर टिका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक असलेला काँग्रेस पक्ष सरकारवर नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून या नाराजीवर भाष्य करत 'काँग्रेस हा जुना पक्ष आहे. जुनी खाट कुरकुर करतेच,' असं अग्रेलखात म्हटले होते.त्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत 'सामनातील अग्रलेख अर्धवट आणि ऐकिव माहितीवर आधारीत असून आपण मुख्यमंत्र्यांकडे आपली भूमिका मांडल्यावर पूर्ण माहिती घेऊन त्यांनी पुन्हा अग्रलेख लिहावा,' असा चिमटा थोरात यांनी काढला होता.
यावर बोलतांना थोरातांचे विरोधक राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मी असे लाचार प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही. अग्रलेख लिहण्याची का वाट पाहावी. आपल्या मनात जर स्वाभिमान शिल्लक असेल तर सत्ता सोडून बाहेर यावे. सरकार मधे सहभागी असेलल्या कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना कोणीही विचारत नाही त्यामुळे ते नाराज असतील तर सत्तेत का आहेत. याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत आहे, असे विखे म्हणाले.