काँग्रेसचे हल्लबोल आंदोलन: कांदा निर्यातबंदी मागे घ्या, दुधाला भाव द्या!
By अरुण वाघमोडे | Published: December 12, 2023 07:44 PM2023-12-12T19:44:14+5:302023-12-12T19:44:33+5:30
हे व्यापाऱ्यांचे सरकार असल्याचे कृतीतून सिद्ध होते, असाही आरोप
अरुण वाघमाेडे, अहमदनगर: कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी, दुधाला चांगला दर द्यावा, इथेनॉल बंदी उठवावी, यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र वाघमारे, संतोष लोंढे, राहुल उगले, शहाजीराजे भोसले, किरण पाटील, संभाजी रोहकले, शोभा पाथारे, अनिल म्हस्के, बाळासाहेब आढाव, नासीरभाई शेख आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना नागवडे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. हे व्यापाऱ्यांचे सरकार असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. इथेनॉल बंदी, कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी, दुधाला चांगला भाव द्याव, पीक विम्याचा अग्रीम हप्ता तातडीने शेतकऱ्यांना द्यावा.
भुजबळ म्हणाल्या, तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची रणनीती केंद्र व राज्य सरकार वापरत असून हुकूमशाहीपणा करत आहे. त्यामुळे यांच्यापेक्षा इंग्रज बरे असे म्हणायची वेळ आली आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे असं आपण अभिमानानं म्हणतो मग या देशात मोदी सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय कसे करु शकतात कारण शेतकरी वाचला तर देश वाचणार आहे. सरकार मात्र, शेतकऱ्यांची दिशाभूल का करत आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळावे. अग्रीम विमा सर्व शेतकऱ्यांना मिळावा, नगर दक्षिण मधील तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत तसेच शेतकऱ्यांना मागील थकीत अनुदान देण्यात यावे. जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.