संगमनेर : आणखी एक राजकारण झाले, मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली. खूप राजकारण त्यामध्ये झाले. सत्यजित तांबे खूप चांगल्या मतांनी विजयी झाले. त्यांचे अभिनंदन आपण यानिमित्ताने करतो आहोत. फक्त जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबतीत मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत. असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.०५) शहरातील जाणता राजा मैदान येथे आनंद, मिलिंद, आदर्श व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही बाणा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ऑनलाईन पद्धतीने आमदार थोरात यांनी संवाद साधला. ते म्हणाले, हे पक्षीय राजकारण आहे. हे बाहेर फार बोलले पाहिजे असे नाही, या मताचा मी कायम आहे. म्हणून त्याबाबत काय जे आहे. ते मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय आणि जे काही करायचे ते योग्य पद्धतीने करू. त्याबाबत आपण काही काळजी करण्याचे कारण आहे, असे मला वाटत नाही. त्यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळामध्ये विधान परिषदेचे राजकारण सुरू होते. त्यामध्ये काही बातम्या अशा आल्या की, भारतीय जनता पक्षापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवले. एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाचे वाटप सुद्धा करून टाकले. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. हे आपण पाहिलेले आहे. अनेक प्रकारच्या चर्चा त्यांनी घडवून आणलेल्या असल्या तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आतापर्यंत त्या विचाराने वाटचाल केली, पुढील वाटचाल सुद्धा त्याच विचाराने आपली राहणार आहे. यांची ग्वाही देतो. माझ्या मनातील भावना यानिमित्ताने मी बोलला आहे.
संगमनेर तालुक्यावर सूड उगावावा अशा पद्धतीने हल्ले
मधल्या एक महिन्याच्या काळात खूप राजकारण झाले. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर सतत संगमनेर तालुक्यावर सूड उगावावा अशा पद्धतीने हल्ले होताना दिसतात. अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला कसा देता येईल, असे पाहिले जाते आहे. त्यांना अडचणीत आणले जात आहे. त्यांचे उद्योग, व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही त्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. विकासाची चाललेली कामे बंद पाडण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो. खरं म्हणजे सत्ता, सत्ता बदल हे सर्वच पाहिलेले आहे. सत्तेत आपणही राहिलो आहे. परंतू दुर्देवाने हा अनुभव यावेळेस आपण यावेळेस घेतो आहे. परंतु संगमनेर तालुक्याने कायमच संघर्ष केला आहे. संघर्षातून आपण मोठे झालो आहे. निळवंडे करता केलेला असेल संघर्ष, नदीच्या पाण्याचा वाटा मिळण्याकरिता केलेला संघर्ष असेल. प्रत्येक गोष्टीतून संघर्षातून आपण यश मिळविलेले आहे आणि पुढे गेलो आहे. या संघर्षातून आपण बाहेर येऊ आणि नव्या उभारीने उभे राहू, याची मला खात्री आहे. असेही आमदार थोरात म्हणाले.