नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच आमने-सामने उभे ठाकण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:23 PM2018-01-16T16:23:05+5:302018-01-16T17:15:04+5:30
लोकसभेची निवडणूक पुढील वर्षभराने होणार असली तरी नववर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्यात लोकसभेचे ढोल वाजू लागले आहेत. काँग्रेसकडून विखे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरु केली आहे.
अहमदनगर : लोकसभेची निवडणूक पुढील वर्षभराने होणार असली तरी नववर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्यात लोकसभेचे ढोल वाजू लागले आहेत. काँग्रेसकडून विखे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरु केली आहे.
शिर्डी मतदारसंघ आरक्षित असल्याने सर्वच राजकीय पक्षांची मदार दक्षिणेवर आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे हे सर्वश्रुत आहे. पण, राष्ट्रवादीकडून एकही चेहरा समोर आलेला नाही. काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांनी मात्र निवडणूक मैदानात उतरण्याची घोषणा करून टाकली आहे. त्यामुळे दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या मैदानात कोण उतरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा. शिर्डी मतदारसंघ आरक्षित आहे. एकमेव दक्षिण मतदारसंघ खुला आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेहमीच काँटे की टक्कर पाहायला मिळते. निवडणूक वर्षभराने असली तरी आतापासून वातावरण तापू लागले आहे. वास्तविक पाहता दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडे आहे़ काँग्रेस- राष्ट्रवादीची जिल्ह्यात आघाडी आहे़ जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र नांदतात. असे असले तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी दक्षिणेतून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने चर्चेचे मोहोळ उठले आहे. दक्षिणेतील विखे समर्थकांमध्ये यामुळे कमालीचा उत्साह संचारला आहे. दक्षिणेची जागा आमच्याकडे आहे आणि आम्ही मैदानात उतरणार, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने दक्षिणेतील कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा, या तालुक्यात मेळावे घेऊन नुकतीच जाहीर केली आहे. दक्षिणेत राष्ट्रवादीही सक्रिय झाल्याने विखे कुठल्या चिन्हावर निवडणूक लढविणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. येत्या १९ जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर जिल्ह्यात येत आहेत. ते काय गुगली टाकतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यात सेनाही यावेळी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. पण, विखे यांना शह देण्याएवढ्या ताकदीचा उमेदवार सध्या तरी सेनेकडे नाही़ भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी पुन्हा उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सेना- भाजपाचे स्वतंत्र उमेदवार असतील का, राष्ट्रवादी कुणाला संधी देणार आणि विखे कोणत्या चिन्हावर लढणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.