हनुमान चालीसा पठण करून काँग्रेसचा निषेध
By अण्णा नवथर | Published: May 6, 2023 02:35 PM2023-05-06T14:35:31+5:302023-05-06T14:35:45+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा काँग्रेसने जाहीर केला आहे.
अहमदनगर: कर्नाटकात सत्ता अल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसने केलेल्या घोषणेचा देशभर एकाचवेळी येत्या मंगळवारी ( दि. ९) हनुमान चालीसा पठाण करून निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती बजरंग दलाचे महाराष्ट्र व गोव्याचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कार्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा काँग्रेसने जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात बजरंग दलाची तुलना पीएफआयशी करण्यात आली असून, कर्नाटक राज्यात सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घालणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत विश्व हिंदू परिषदेने अहमदनगर येथे पत्र परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेस बजरंग दलाचे राजेंद्र साेनवणे, मुकूल गंधे, कुणाल भंडारी आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, काँग्रेसने विशिष्ट एका समाजाला खूश करण्यासाठी बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली असून, काँग्रेसची रावण रुपी लंका समाजच नष्ट करील. विशिष्ट एका समाजाच्या वोट बँकेवर राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहे. याचे भानही काँग्रेसला राहिलेले नाही. काँग्रेसची मानसिक स्थिती बिघडली असून, काँग्रेसने केलेल्या घोषणेचा देशभरात एकाचवेळी हनुमान चालीचा पठण करून निषेध करण्यात येणार आहे, असे कुलकर्णी म्हणाले.