काँग्रेसने केला राज्य लोकसेवा आयोगाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 05:13 PM2021-03-11T17:13:55+5:302021-03-11T17:14:30+5:30
कोरोनाचे कारण देत ऐनवेळी राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षाा पुढे ढकलल्यामुळे नगरमध्ये काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून एमपीएससीचा निषेध करण्यात आला.
अहमदनगर : कोरोनाचे कारण देत ऐनवेळी राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षाापुढे ढकलल्यामुळे नगरमध्ये काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून एमपीएससीचा निषेध करण्यात आला.
अवघ्या तीन दिवसांवर आलेली एमपीएससी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने गुरूवारी घेतला. एमपीएससीने तसे परिपत्रक जाहीर केल्यानंतर राज्यभर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. मुंबई, पुणे येथे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
नगरमध्येही गुरूवारी दुपारी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बालिकाश्रम रोडवरून दिल्लीगेटपर्यंत मोर्चा काढला. शासनाने आतापर्यंत अनेकवेळा एमपीएससीची परीक्षा विविध कारणास्तव पुढे ढकलली आहे. त्यामुळे तयारी करणारे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आता पुन्हा १४ मार्च रोजी होणारी ही परीक्षा एमपीएससीने काहीही पूर्वसूचना न देता गुरूवारी पुढे ढकलली. हा अन्यायकारक निर्णय आहे. एमपीएससीने व शासनाने त्वरित परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.