अहमदनगर : शहर जिल्हा कॉँग्रेसकडून डावलले जात असल्याची भावना झालेल्या कॉँग्रेसच्या नगरसेवकांना लोणीतून पाठबळ मिळाले आहे. महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवकही कॉँग्रेस नगरसेवकांच्या मदतीला धावले. दोघांनी संयुक्त पत्रक काढत नाव न घेता सत्यजित तांबे यांना ‘स्वयंघोषित पुढारी’ संबोधून आघाडीत विनाकारण खोडा घालू नये, असा सल्ला दिला. राष्ट्रवादीने कॉँग्रेसला आगामी महापौर पदाच्या निवडणुकीत गृहीत धरू नये, कॉँग्रेस स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे पत्र सत्यजित तांबे यांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर रविवारी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संयुक्त पत्रक प्रसिद्धीस दिले. महापालिकेत कॉँग्रेसचे ११ नगरसेवक असून त्यातील एक-दोन वगळता सर्व नगरसेवक कोतकर यांना मानणारे म्हणजेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नेतृत्व मानणारे आहेत. तांबे यांच्या पत्रकाकडे नगरसेवकांनी विखे याचे लक्ष वेधल्यानंतर त्यांना पाठबळ मिळाले. त्यामुळेच दोन दिवसांनी उशिराने संयुक्त पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. नगर शहर विकासाची प्रक्रिया महापालिकेच्या माध्यमातून वेगाने पुढे जात असून विकासाचे निर्णय दोन्ही कॉँग्रेसने एकत्र घेतलेले आहेत. कोणी कोणाची फसवणूक केली नाही अन् प्रश्न रखडल्याची तक्रार नाही. दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीचा निर्णय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या समन्वयातून झालेला आहे. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची प्रक्रिया सुरू असून आगामी महापौर पदाच्या निवडणुकीतही हेच राज्यस्तरीय नेते अंतिम निर्णय घेतील, असे स्पष्ट करत नगर शहराच्या राजकीय क्षेत्रात नवखा प्रवेश असलेल्यांनी स्वत:च्या मोठेपणासाठी पत्रकबाजी करून आघाडीत विनाकारण खोडा घालू नये, असा सल्ला आगाडीच्या नगरसेवकांनी दिला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी कॉँग्रेस नगरसेवकाच्या प्रभागात आमदार निधीतून १५ कोटी रुपये दिले आहेत. निधी देताना कोणताही भेदभाव केला नाही. त्यामुळे विकास निधी संदर्भात कोणा नगरसेवकांची काहीच तक्रार नाही. जे स्वपक्षातील नगरसेवकांना विश्वासात घेवू शकत नाहीत, ते नगर शहरातील जनतेचा विश्वास कसा मिळविणार, असा प्रश्न आघाडीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अरीफ शेख, विपुल शेटीया, विजय गव्हाळे, कुमार वाकळे, संपत बारस्कर, अविनाश घुले तसेच कॉँग्रेसचे फैय्याज शेख, निखील वारे, सुनील कोतकर, सुनीता कांबळे, सविता कराळे यांनी संयुक्तपणे हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. महापौराच्या निवडीतही विखे-थोरात हे राजकारण पेटण्याची चिन्हे यामुळे दिसू लागली आहेत.(प्रतिनिधी)
कॉँग्रेस नगरसेवकांना लोणीतून पाठबळ
By admin | Published: April 25, 2016 11:18 PM