आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बैठका; नगर, शिर्डीत हालचाली

By अरुण वाघमोडे | Published: August 9, 2023 03:53 PM2023-08-09T15:53:54+5:302023-08-09T16:00:10+5:30

नगर दक्षिणेचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून लढवत आहे. मात्र, याही मतदारसंघावर मुंबईत झालेल्या लोकसभा आढावा बैठकीमध्ये काँग्रेसने दावा केला आहे.

Congress to hold meetings in Nagar, Shirdi for the upcoming Lok Sabha elections | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बैठका; नगर, शिर्डीत हालचाली

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बैठका; नगर, शिर्डीत हालचाली

अहमदनगर : काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली. राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या रविवारी (दि.१३) नगर शहरात दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर शिर्डीत उत्तरेची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली.

या बैठकीसाठी निरीक्षक हंडोरे यांच्यासह दक्षिण मतदारसंघाचे नवनियुक्त समन्वयक वीरेंद्र किराड (पुणे), शिर्डी मतदारसंघाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड (नाशिक), आमदार लहू कानडे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी १० वाजता शिर्डीच्या शासकीय विश्रामगृह येथे तर नगर शहरात नगर मनमाड रोडवरील हॉटेल मेघनंद या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मागील निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. मात्र, विद्यमान खासदार हे सत्ताधारी शिंदे शिवसेनेसह भाजप बरोबर उघडपणे गेले आहेत. त्यामुळे या जागेवर उत्तरेतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा उमेदवार देण्याचा आग्रह सुरुवातीपासून धरला आहे.

नगर दक्षिणेचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून लढवत आहे. मात्र, याही मतदारसंघावर मुंबईत झालेल्या लोकसभा आढावा बैठकीमध्ये काँग्रेसने दावा केला आहे. त्यातच शहर जिल्हा काँग्रेसने आ. बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघातून उमेदवारी करावी अशी आग्रही मागणी लावून धरली आहे. लोकसभा ही देशाची निवडणूक आहे. कोणता मतदारसंघ कुणाकडे याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरेल. मात्र जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस तयारी करणार असल्याची माहिती किरण काळे व राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.

Web Title: Congress to hold meetings in Nagar, Shirdi for the upcoming Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.