वंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:28 AM2019-07-22T02:28:01+5:302019-07-22T02:28:23+5:30
बाळासाहेब थोरात : मनसेबाबत मात्र द्विधा मनस्थिती
शिर्डी : लोकसभा निवडणुकीत पारंपरिक मतांना धक्का बसल्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास इच्छुक आहे़ मात्र राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याबाबत द्विधा मनस्थितीत आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रविवारी थोरात यांनी साईदरबारी हजेरी लावली़ पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, वंचितमुळे लोकसभेत ९ जागांवर काँग्रेस-राष्टÑवादीला फटका बसला़ त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष व पुरोगामी शक्तींना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या सभांना लाखोंची गर्दी होती. मात्र ही गर्दी मतात परावर्तित होऊ शकली नाही. त्यामुळे मनसेला सोबत घेण्याबाबत पक्षात द्विधा मनस्थिती आहे. जागा वाटपाबाबत मनसेकडून अद्याप प्रस्तावही आलेला नाही. मनसेला सोबत घ्यायचे की कसे, याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक व गोव्यात भाजपकडून सुरू असलेला प्रकार दुर्दैवी, लोकशाहीला घातक व सामान्य जनतेला आवडणारा नसल्याचे सांगून सर्वसामान्यांना शंका असेल तर निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही थोरात यांनी केली़
विमानातील भेटीचा विखेंचा योगायोग
खासदार डॉ़ सुजय विखे व तुम्ही विमानात सोबत प्रवास केल्याचे फोटो माध्यमात झळकले़ या भेटीत आपसात काय चर्चा झाली. याबाबत त्यांना छेडले असता, तो केवळ योगायोग होता. व्यक्तीद्वेषाला कधीही स्थान देत नसल्याने आपण खासदार विखेंचे विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच वडीलकीच्या नात्याने चांगले काम करण्याचा सल्लाही दिल्याचे थोरात यांनी सांगितले़