संगमनेर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय समित्यांचे गठन करण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु कॉँग्रेस कार्यकर्त्यांना या समित्यांमध्ये उचित स्थान दिले जात नाही. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शासकीय समित्यांमध्ये युवक काँग्रेसला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
तांबे यांनी या मागणीचे पत्र थोरात यांच्यासह कॉँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व इतर मंत्र्यांनाही पाठविले आहे. त्यात तांबे यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन सात महिने होत आले आहेत. राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री, तर सर्वच ३६ जिल्ह्यांत आपण पक्ष संघटनेच्या कामाच्या समन्वयासाठी संपर्क मंत्री नेमले आहेत. कॉँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना राज्यातील युवक पदाधिका-यांची यादी फोन नंबरसह पोहोच केली आहे. मंत्र्यांनी दौरा असताना संबंधित जिल्ह्यांमधील युवक पदाधिका-यांना सोबत ठेवण्याच्या दृष्टीने ही यादी सुपुर्द केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या संघटना बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू होणे गरजेचे आहे. या प्रक्रियेतून पक्षाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतील़ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसने पक्षाच्या उमेदवारांचे काम केले. त्यामुळे राज्यस्तरीय शासकीय समित्या व महामंडळासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.