अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. सुजय विखे थोड्याच वेळात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. हा सोहळा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.विखे भाजपात गेल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीही भाजपात जाण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तेही या सोहळ््यासाठी रवाना झाले आहेत. यासह महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवकही रवाना झाले आहेत. विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
अहमदनगर पालिकेतील काँग्रेस नगरसेवक भाजपात?महापालिकेत काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकांचे पतीराज डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेश सोहळ््यास मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तेही भाजपमध्ये जाणार की केवळ प्रवेश सोहळ््याला उपस्थित राहणार? याबाबत तर्कवितर्क आहेत.शहर काँग्रेसने महापालिकेची निवडणूक डॉ. सुजय विखे यांच्याच नेतृत्वाखाली लढविली होती. केडगावचे काँग्रेसचे उमेदवार अचानकपणे भाजपात गेले. त्यामुळे विखे यांना मोठा धक्का बसला होता. मात्र विखे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले. हे नगरसेवक विखे यांनाच मानणारे आहेत. रुपाली वारे, संध्या पवार, शेख रिजवाना, शीला चव्हाण, सुप्रिया जाधव या काँग्रेसच्या पाच नगरसेविका आहेत. शीला चव्हाण यांचे पती दीप चव्हाण सध्या शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष आहेत. त्यामुळे चव्हाण वगळता अन्य नगरसेविकांचे पतीराज डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेश सोहळ््यास हजर राहणार आहेत. यामुळे आता काँग्रेसच्या पाचही नगरसेविका लोकसभेत भाजपचा प्रचार करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
खासदार गांधी परतले...शनिवारी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना नगरला येत डॉ.सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केली. यानंतर तातडीने खासदार दिलीप गांधी यांनी दिल्ली गाठली. दिल्लीनंतर काल ते मुंबईत पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ‘ सुजय विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून अद्याप पण उमेदवारीचा निर्णय झालेला नसल्याचे सांगत त्यांनी गांधी यांची समजूत काढली. त्यानंतर खासदार दिलीप गांधी नगरला परतले आहेत. मात्र खासदारकीच्या तिकिटाचा शब्द घेऊनच डॉ.विखे भाजपात दाखल होत आहेत्