गुजरातमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढला : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 07:20 PM2017-12-18T19:20:37+5:302017-12-18T19:23:41+5:30
गुजरात राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० जागांवर मिळालेला विजय मोठी लक्षणीय बाब आहे. हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा गुजरातमध्ये जनाधार वाढल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
अहमदनगर : गुजरात राज्य विधानसभा निवडणुकीतकाँग्रेसला ८० जागांवर मिळालेला विजय मोठी लक्षणीय बाब आहे. हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा गुजरातमध्ये जनाधार वाढल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
गुजरात प्रदेश काँग्रेसच्या उमेदवार निवड व छाननी समितीच्या अध्यक्षपदी थोरात यांची तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नियुक्ती केली होती. गुजरातमधील काँग्रेस उमेदवार निवडीत व प्रचारात थोरात यांची महत्त्वाची भूमिका होती. या पार्श्वभूमीवर थोरातांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने कायम सर्वधर्म समभावाचा विचार जोपासला. गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून सातत्याने विकासकामे केली आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखविला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये ५७ जागांवरून ८० जागांवर मिळालेला विजय ही मोठी लक्षणीय बाब आहे. इतर ठिकाणीदेखील काँग्रेसच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली आहे. हुकूमशाही विचारसरणी असलेल्या भाजपच्या गुजरातमधील जागा घटल्या आहेत. यापुढे सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करीत यश मिळवेल. गुजरातमधील भाजपचा विजय हा दबाव व धनशक्तीचा असून, काँग्रेसचा जनाधार वाढला आहे, असे थोरात म्हणाले.
देशात मोदींची लोकप्रियता घसरत असून, भाजप व मोदींचा विकासकामांवर विश्वास नाही. त्यामुळे धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून राम मंदिरासारखा संवेदनशील विषय निवडणूक काळात बाहेर काढला. काँग्रेसविरुद्ध दर्जाहिन अपप्रचार केला. मात्र मोदी-शहांच्या भूमीत ८० जागांवर मिळविलेला नेत्रदीपक विजय हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेला मोठा विश्वास असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.