श्रीरामपूर : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत श्रीरामपुरातून माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची बिनविरोध निवड झाली. प्रदीर्घ काळानंतर येथून दोन संचालकांना बँकेवर जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे श्रीरामपूरच्या राजकारणात सहमती एक्स्प्रेस सुरू झाल्याची चर्चा आहे. या प्रयोगाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी साथ दिली आहे.
गुरुवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. सेवा संस्था मतदारसंघातून करण ससाणे यांनी अर्ज मागे घेतला तसेच भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे समर्थक माजी सभापदी दीपक पटारे यांनीही अर्ज मागे घेतला. त्यामुळे भानुदास मुरकुटे सेवा संस्थेतून बिनविरोध विजयी झाले. त्याचवेळी करण ससाणे यांचीही इतर मागासवर्गीय मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली. सेवा संस्था मतदारसंघातून दीपक पटारे यांच्याकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ नव्हते. पटारे यांनी मुरकुटेंच्या बिनविरोधकरिता विखे यांच्या आदेशावरून माघार घेतली की स्वत:हून हा निर्णय घेतला हे समजू शकले नाही.
बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातून अनेक तालुक्यांमध्ये एकतर्फी निकाल अपेक्षित होते. श्रीरामपुरात सेवा संस्थेच्या ६९ मतदारांमधून चुरशीच्या लढतीची शक्यता होती. मात्र महसूलमंत्री थोरात यांनी ससाणे व मुरकुटे या दोघांशीही मंगळवारी संगमनेर येथे स्वतंत्र चर्चा केली. असे असले तरी कोणताही ठोस निर्णय त्यांना कळविला नव्हता. गुरुवारीच त्यावरील पडदा उठला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये दिवंगत नेते आमदार जयंत ससाणे व भानुदास मुरकुटे यांच्यात नेहमीच मोठा संघर्ष झाला. मतदार पळवापळवीचे प्रकार घडले. आता दोघांच्याही बिनविरोध निवडीमुळे हा संघर्ष काहीसा थंडावणार आहे. श्रीरामपूरच्या राजकारणात ही बदलाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. सहमतीच्या राजकारणाची सुरुवात त्यातून होणार असून, आगामी काळातील अशोक साखर कारखाना, बाजार समिती, तसेच नगरपालिका निवडणुकीत त्यामुळे मोठे राजकीय बदल होतील, असा कयास बांधला जात आहे.
----------
थोरातांकडून ससाणेंना पाठबळ
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मतदारसंघातून तब्बल ३३ अर्ज दाखल होते. यात जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचाही समावेश होता. मात्र महसूलमंत्री थोरात यांनी ससाणे यांना पाठबळ दिले. यापूर्वी जयंत ससाणे हे बँकेचे संचालक राहिले आहेत. करण यांना दुसऱ्यांदा बँकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.