अहमदनगर : राज्यातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्राचे सरकार आहे. त्यांनी अतिवृष्टीत जे दौरे केले आणि पक्ष प्रवेशावर जो वारेमाप खर्च सुरु आहे, तो जरी टाळला असता तरी शेतकर्यांना हेक्टरी १० ऐवजी १२ हजारांची मदत मिळाली असती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यातील मंत्र्यांनी नेमके पहिले काय ?असा खोचक सवाल खासदार डॉ. विखे यांनी उपस्थित केला.
नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या शनिवारी कार्यक्रमात खासदार डॉ.सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राज्यसरकावर चांगलीच आगपाखड केली.
नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथे सुमारे २२ कोटी रुपये खर्चाच्या नगर -जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या नूतनीकरण आणि डांबरीकरण कामाचे भूमिपूजन डॉ.विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.पाचपुते, माजी आमदार कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग उपस्थित होते.
राज्यात अतिवृष्टी झाली आणि मोठे मोठे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यावेळी कोणी कांदा तर कोणी सोयाबीन हातात घेऊन फोटोसेशन केले. त्यांचे दौरे ही हायफाय होते.हेलिकॉप्टरमधून दौरे करून मोठा खर्च केला. पक्ष प्रवेशही हेलिकॉप्टरमधून सुरु आहेत. यांनी हा सगळा खर्च वाचवला असता तर शेतकर्यांना जी १० हजाराची हेक्टरी मदत दिली ती १२ हजारांनी मिळाली असती. यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नेमके काय पहिले? असा सवाल विखे यांनी केला.
पावसाने सर्व रस्त्यांची वाट लावली. पण राज्य सरकार प्रत्येक वेळी केंद्राकडे पाहते. मग हे सरकार काय फक्त बदल्या करण्यात आणि आपल्या मतदार संघातील कामात व्यस्त आहे का? असा सवाल आ. पाचपुते यांनी केला.
सरकारने कोरोनाचा मृत्युदर लपवला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राला मदत मागितली जाते. हे विरोधात होते तेव्हा हेक्टरी ५० हजारांची मदत मागत होते. मग आता हा हात आखडता घेतला? असा सवाल माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला.