चंद्रकांत शेळके ।
अहमदनगर : लॉकडाऊनमुळे महावितरणने ग्राहकांना घरपोहच बिले दिली नाहीत, त्यामुळे ग्राहकांनीही ती भरली नाहीत, त्यात उन्हाळ्याचे दिवस व लॉकडाऊन असल्याने वीजवापरही आपोआप वाढला. या सर्वांचा परिणाम आता जूनमध्ये दिसत असून मार्च, एप्रिल व मे असे तीन महिन्यांचे भरगच्च बिल हातात पडल्याने ग्राहकांना जोरदार ‘शॉक’ बसला आहे. दरम्यान, या तीन महिन्यांत जिल्ह्यात घरगुती ग्राहकांचे १६० कोटी रूपये थकले आहेत.
लॉकडाऊनमध्ये सर्वच यंत्रणा ठप्प होत्या. सुरक्षिततेची बाब म्हणून या काळात महावितरणने वीजबिलांचे घरोघरी वाटप केले नाही. शिवाय मीटर रिडिंग घेण्यासाठीही कर्मचारी घरोघरी पाठवले नाहीत. या काळातील बिले आॅनलाईन पाठवण्यावर महावितरणने भर दिला. ज्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी महावितरणकडे आहेत, त्यांना बिले पाठवण्याचा प्रयत्न झाला. तसे आवाहनही महावितरणने केले होते. परंतु त्यास ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. परिणामी वसुली केवळ १५ ते २५ टक्क््यांवरच थांबली. याशिवाय लॉकडाऊनमध्ये विजेचा घरगुती वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. मार्च, एप्रिल व मे अशी तीनही महिने कडक उन्हाळ्याची असल्याने वातानुकूलित यंत्रणा, पंखा, कुलर, फ्रिज, तसेच इतर घरगुती उपकरणांचा वापरही आपसूकच वाढला. त्याचा एकत्रित परिणाम ग्राहकांची या तीनही महिन्यांतील बिले फुगली.
महावितरणने रिडिंगच घेतले नसल्याने या तीनही महिन्यांत आधीच्या वापरावर सरासरी बिले तयार करण्यात आली. परंतु लॉकडाऊन असल्यानेही ही बिले ग्राहकांच्या घरापर्यंतच पोहोचली नाहीत. महावितरणने आॅनलाईन बिले देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मर्यादा आल्या. त्यातही ज्यांना आॅनलाईन बिले मिळाली त्यांनीही बिल भरण्याकडे कानाडोळा केला. महावितरणने जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या महिन्यात अनुक्रमे सुमारे ६०, ५४ व ६४ कोटींची बिले दिली. त्याची वसुली १०० टक्के झाली. परंतु लॉकडाऊनच्या काळात म्हणजे एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांत अनुक्रमे ६४, ६६ व ६६ अशी १९६ कोटींची बिले तयार झाली. त्या तुलनेत या तीन महिन्यांत केवळ ३७ कोटीची वसुली झाली. म्हणजे तब्बल १५९ कोटींची थकबाकी ग्राहकांकडे राहिली. ती थकबाकी आता जूनच्या महिन्यात एकत्रित आल्याने जूनचे बिल तिप्पट वाढले आहे. लॉकडाऊनमध्ये आता महावितरणच्या या शॉकने ग्राहक घायाळ झाले आहेत.