अहमदनगर: नगर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील स्टेशन रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या नळावाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने पाण्याच्या टाक्या साफ करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी प्रभागातील नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्यासह सुवर्णा जाधव व विद्या खैरे यांच्यावतने आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे स्टेशन परिसरातील आगरकर मळा, अर्बन बँक कॉलनी, गवळी वाडा, संभाजी कॉलनी, जयभिम हौसिंग सोसायटी, गजानन कॉलनी, आनंदनगर, संजीवनी कॉलनी, आदर्श गौतमनगर, स्वामी समर्थ मार्ग, सागर कॉम्प्लेक्स, विशाल कॉलनी, एकता कॉलनी, बोहरी चाळ, नवीन व जुना टिळक रोड, पटेलवाडी, संजयनगर, गाझीनगर, काटवन खंडोबा रोड, आगरकर मळा व स्टेशन रोड संपूर्ण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दुषित पिण्याचे पाणी येत आहे.
या परिसराला पाणी पुरवठा करणारी उंच पाण्याची टाकी व संपवेलमध्ये गाळ साचल्यामुळे या भागात दुषित पाणी येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आजारी पडले आहे. याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत, याकरिता आगरकर मळा येथील पिण्याच्या पाण्याची उंच टाकी व संपवेल या दोन्ही टाक्या स्वच्छ धुवून घेण्यात याव्यात व सदरील भागातील पिण्याचा पाणी पुरवठा स्वच्छ व पुरेशा दाबाने करण्यात यावा. अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.