अहमदनगर : चितळे रस्त्यावरील नेहरू भाजी मार्केटची इमारत उभारताना विकसकाला मोठा फायदा होणार आहे. भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन ग्राऊंड फ्लोअरमध्ये होणार आहे. विकसकाला मिळणाऱ्या नफ्यात महापालिकेला वाटा मिळून आर्थिक हित जोपासले जावे, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले. नेहरू मार्केट संदर्भात भाजी विक्रेत्यांच्यावतीने संजय झिंजे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. नेहरू मार्केट व शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीचा प्लॅन महापालिकेने खंडपीठात सादर केला. मात्र, त्यातून विकसकाला मोठा नफा मिळेल, महापालिकेचे आर्थिक नुकसान होईल ही बाब झिंजे यांच्यावतीने अॅड. सतीश तळेकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. तळघरात पार्किंग तसेच ग्राऊंड फ्लोअरवर भाजी विक्रेत्यांसाठी ओटे, गाळे बांधावे. शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळे विक्रीतून विकसकाला होणाऱ्या नफ्यात महापालिकेलाही हिस्सा मिळाला पाहिजे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. यासंदर्भात याचिकाकर्ते, विकसकाशी महापालिकेने चर्चा करावी, असे खंडपीठाने सूचित केले. उपायुक्त भालचंद्र बेहेरे, प्रकल्पप्रमुख आर. जी. मेहेत्रे यावेळी उपस्थित होते. ७ जुलै रोजी याचिकेवरील पुढील सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
विकसकाच्या नफ्यात मनपाही हिस्सेदार
By admin | Published: June 26, 2016 12:30 AM