श्रीरामपूर : तालुक्यातील पढेगाव येथे कोळशाच्या भट्टीवर काम करणा-या दोघा मजुरांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रवींद्र याच्या वडिलांनी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.शनिवारी रात्री भट्टीजवळ झोपलेले रवींद्र सखाराम घोगरे व संतोष शिवा वाघमारे हे मजूर मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. योगेश रोहिदास पवार या ठेकेदारने काटवनातील लाकडांची भट्टी लावून कोळसा पाडण्यासाठी या दोघांना काम दिले होते. त्यानेच घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळविली होती. पोलिसांनी मजुरांच्या कुटुंबीयांशी (रा. गायचोल, पोस्ट चणेरा, ता. रोहा) संपर्क साधत मृतदेह शवागृहात ठेवले. पढेगाव येथे आरोग्य केंद्रात प्राथमिक तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.सोमवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. धुरामुळे गुदमरल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी ठेकेदाराविरोधात फिर्याद देण्याचा निर्णय घेतला.मयत संतोष याने घटनेच्या आदल्या दिवशीच खुशाल असल्याचे फोनवरून कळविले होते. त्याचबरोबर ठेकेदाराकडे कोळशाच्या भट्टीची शासकीय परवानगी आहे काय याबाबतही विचारणा केली होती, असे फिर्यादी सखाराम घोगरे यांनी म्हटले आहे. ठेकेदार परवानगीविनाच व्यवसाय चालवत होता व त्याने मजुरांच्या सुरक्षितेविषयी कुठलीही खबरदारी न घेतली नाही. त्यामुळे दोघांच्याही मृत्यूस तो दोषी असल्याचे घोगरे यांनी म्हटले आहे. ठेकेदार पवार यास अटक करण्यात आली आहे.