श्रीगोंदा (अहमदनगर) : साई सहारा एजन्सीने टॅक्करचे भाडे न दिल्याने श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी आज सकाळी सहा वाजल्यापासून संप सुरू केला. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडणार आहे. चार दिवसांपूर्वी टँकर चालकांनी 5 जूनपूर्वी टँकरचे भाडे न दिल्यास 7 जूनपासून आम्ही टँकर बंद आंदोलन करणार असा इशारा दिला होता.साई सहारा एजन्सीचे सुरेश पठारे यांनी टँकर मालकांच्या भावना विचारात घेऊन 10 जूनला टँकर भाडे अदा करू, असे आश्वासन दिले. पण टँकर मालकांचे समाधान झाले नाही. त्यांनी जोपर्यंत गटविकास अधिकारी, तहसीलदार यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत तोपर्यंत टँकर बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे. श्रीगोंदा तालुक्यात 67 पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत. आज सकाळी 11वाजता पंचायत समितीत गटविकास अधिकारी प्रशांत काळे साईसहाराचे सुरेश पठारे व टँकर चालकात बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
ठेकेदाराने थकविले टँकरचे भाडे; श्रीगोंदा येथे टँकर चालकांचा संप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 7:40 AM