लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या चौथ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने राहाता येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास आमदार राधाकृष्ण विखे यांनी सदिच्छा भेट दिली. रक्तदानासाठी सामाजिक बांधिलकीने पुढे आलेल्या रक्तदात्यांचे त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन कौतुक केले.
विखे म्हणाले, कोरोनाचे जागतिक संकट मोठे आहे, त्याची तीव्रता अद्यापही कमी झालेली नाही. उपचारांबरोबरच रुग्णांना रक्ताची गरजही भासत आहे. सद्य परिस्थितीत मोठ्या रुग्णालयांबरोबरच रक्तपेढ्यांमध्ये भासत असलेला रक्ताचा तुटवडा विचारात घेऊन खासदार डॉ. विखे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने इतर सर्व कार्यक्रम रद्द करून सात तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिराचा उपक्रम आयोजित केला.
प्रारंभी पद्मभूषण डॉ. विखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, भाजपचे उपाध्यक्ष ॲड. रघूनाथ बोठे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे यांनीही या रक्तदान शिबिरास भेट दिली.
स्मृतिदिनाच्या निमिताने पुणतांबा येथेही आशा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०३ व्यक्तींनी रक्तदान केले. राहाता येथील शिबिरात १०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. पायरेन्स संस्थेत वनऔषधी लागवड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
(३०विखे)