शिवाजी पवार ।
श्रीरामपूर : पोलिसांना एखादा खर्च करावयाचा झाल्यास सर्रासपणे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचे सौजन्य घेता येत नाही. त्यासाठी पोलिसांचेच कायद्याने हात बांधले गेले आहेत. मात्र त्यांनी थेट मद्यार्क कंपनीचे सौजन्य घेतले. सौजन्यातून पोलीस चौकी बांधली. सौजन्याचे जाहीर आभार मानण्यात आले.
श्रीरामपूर पोलिसांच्या या प्रतापामुळे कायदा आणि नैैतिकतेच्या आधाराला तडे गेले आहेत. श्रीरामपूर-नेवासा महामार्गावर पोलिसांनी एका खासगी मद्यार्क कंपनीच्या सौजन्याने पोलीस चौकी उभारली आहे.
लवकरच चौकीचे उद्घाटन होणार असून पोलीस कर्मचारी सजावटीसाठी काम करत आहेत. पोलिसांना कायद्याचे रक्षण करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवता येत नाही. वेळेप्रसंगी कोणावरही कारवाई करावी लागते. त्यामुळे सरकारशिवाय कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचे त्यांना सौजन्य घेता येत नाही. मात्र हे सर्व नियम श्रीरामपूर पोलिसांनी पायदळी तुडविले.
सरकारने कडक संचारबंदीच्या काळात सुरू केलेली मद्यार्क विक्री चर्चेचा विषय ठरली होती. त्यावर अनेकांनी सडकून टीका केली होती. येथे मात्र मद्यार्क कंपनीच्या सौजन्याने पोलिसी कारभार करण्याचा अजब प्रयत्न झाला आहे.
आमदारांनी विचारला पोलिसांना जाबपोलिसांच्या या कामगिरीची आमदार लहू कानडे यांनी दखल घेतली आहे. मात्र ही दखल पोलिसांना महागात पडणारी आहे. कारण पोलिसांच्या कारनाम्यांची तक्रार आमदारांनी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे. आमदार कानडे यांनी पोलिसांकडे गुरुवारी लेखी खुलासा मागितला आहे. पोलिसांनी चौकी उभारताना जागा खरेदी केली कशी? लोकवर्गणी उभारण्याचा तुम्हाला अधिकार दिला कोणी? लोकवर्गणीतून किती पैैसे गोळा केले व त्याकरिता वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती का? अशी प्रश्नांची सरबत्तीच आमदार कानडे यांनी केली आहे.
पोलीस चौकीची हारेगावफाटा येथे नितांत आवश्यकता होती. तेथे गुन्हेगारी कारवाया होत होत्या. स्थानिक ग्रामस्थांचीही पोलीस चौकीची जुनीच मागणी होती. खासगी कंपनीने याकरिता दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली. अन्य एका कंपनीने जागा उपलब्ध करुन दिली. जनतेच्या हिताकरिताच ही पोलीस चौकी उभारली आहे.-राहुल मदने, पोलीस उपाधीक्षक, श्रीरामपूर.