अहमदनगर : वाळूच्या थकीत दंड वसुलीसाठी महसूलने कंबर कसली आहे़ दंड थकविणाऱ्या वाळू माफियांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यावर शासकीय फलक लावण्यात येणार असून, जिल्ह्यातील ४०८ वाळू तस्करांच्या जमिनीवर शासकीय फलक लावण्याची कार्यवाही तहसीलदारांकडून सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे गावोगावच्या वाळू तस्करांची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे़वाळू विक्रीच्या आॅनलाईन लिलावाकडे वाळू तस्करांनी पाठ फिरविली आहे़ त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे़ बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर पाचपट दंड आकारला जातो़ मात्र, दंडात्मक कारवाईला वाळू माफिया भीक घालत नाहीत़ त्यामुळे केवळ दंडाचा कागदोपत्री आकडा फुगला़ चारवेळा नोटिसा बजावून देखील महसूलची तिजोरी रिकामीच आहे़ त्यामुळे दंड वसुलीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ दंड वसुलीसाठी महसूल खात्याने कंबर कसली असून, दंड वसुलीसाठी वाळू माफियांच्या जमिनीवर शासकीय फलक लावण्याच्या सूचना संबंधित तहसीलदारांना करण्यात आल्या आहेत़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४०८ वाळू माफियांकडे ६९ कोटी २४ लाख ९ हजार ३७९ रुपये दंड थकीत आहे़ हा दंड वसुली करण्यासाठी हे फलक लावण्यात येणार आहेत़ त्यामुळे वाळू माफियांच्या जमिनीवर काही दिवसांत शासकीय फलक झळकणार आहेत़ एवढे करुनही दंड वसूल न झाल्यास जमिनीचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़वाळूचा बेकायदा उपसा केल्याप्रकरणी सर्वाधिक कारवाया कर्जत तालुक्यात करण्यात आल्या आहेत़ कर्जत तालुक्यात १३४ वाळूतस्करांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़ त्यापैकी ११ वाळू माफियांनी दंड भरला असून, उर्वरित १२३ जणांनी महसूलला ठेंगा दाखविला आहे़ दंड न भरणाऱ्यांना १२३ जणांच्या जमिनीवर शासकीय फलक लावले जाणार आहेत़ दंडात्मक कारवाईत श्रीगोंदा तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो़ या तालुक्यातील १२१ वाळू माफियांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एकूण ११ जणांनी महसूल खात्यात दंड भरला आहे़ राहुरी तालुक्यात ९८ जणांची वाहने पकडून दंड आकारण्यात आला़ परंतु, अद्याप ६३ वाळूतस्करांनी दंडाचे पैसे भरले नाहीत़ दंड न भरणाऱ्यांच्या जमिनीवर शासकीय फलक लावण्यात येणार असल्याने दंड बुडव्यांची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे़ (प्रतिनिधी)दंड बुडविणारे वाळूमाफियानगर-१४, नेवासा-१, श्रीगोंदा-११०, पारनेर-२७, संगमनेर-५, अकोले-१, कर्जत-१२३, जामखेड-४, श्रीरामपूर-१८, राहुरी-६३, पाथर्डी-१, शेवगाव-१, कोपरगाव-६, राहाता-३५.़़़
वाळू तस्करांच्या जमिनींवर ताबा
By admin | Published: December 22, 2015 11:09 PM