Pooja Khedkar ( Marathi News ) : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील आणि माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. दिलीप खेडकर यांनी यंदाची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. त्यानंतर आता ते शेवगाव-पाथर्डी या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते.
बनावट कागदपत्रांचा आधार घेत भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यामुळे पूजा खेडकर ही अडचणीत आल्याने काही महिन्यांपासून खेडकर कुटुंब चर्चेत आहे. पूजा हिच्यासह तिचे आई-वडीलही विविध वादांमुळे चर्चेत आहेत. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मनोरमा खेडकरसह आरोपी असलेल्या दिलीप खेडकर यांना न्यायालयाने तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसंच दिलीप खेडकर यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडे कामात अडथळा आणल्याप्रकरणीही तक्रार नोंदवण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार दिलीप आकडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात २ पानी तक्रार अर्ज दिल्यामुळे दिलीप खेडकर अडचणीत आले होते.
दरम्यान, विविध वादांमुळे चर्चेत असणाऱ्या दिलीप खेडकर यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून ते नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.