अहमदनगर : भगवानगडावर (ता. पाथर्डी) दसरा मेळावा घेण्यावरून मंत्री पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरू झाले आहेत. याबाबत त्यांच्या समर्थकांनी परस्परविरोधी निवेदने जिल्हा प्रशासनाला दिली आहेत.श्रीक्षेत्र भगवानगडावर अनेक वर्षांपासून दसरा मेळावा होतो. वंजारी समाजाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मेळाव्याला देशाच्या कानाकोपºयातून भाविक येतात. त्यामुळे ३० सप्टेंबरला दसरा मेळावा गडावर घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बुलढाणा व वाशिम जिल्हा कृती समितीने जिल्हाधिकाºयांकडे गुरुवारी केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गड ताब्यात घेऊन दसरा मेळाव्यास विरोध केल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजीही करण्यात आली.महंत नामदेवशास्त्री सानप यांच्या समर्थक असलेल्या शेवगाव तालुक्यातील राणेगाव व शिंगोरी येथील ग्रामस्थांनी शेवगावचे तहसीलदार दीपक पाटील यांना बुधवारी निवेदन दिले. श्री क्षेत्र भगवानगड हे स्थान राजकारणविरहित आहे. त्याचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने दसºयाच्या दिवशी येथे कुठल्याही मेळाव्यास परवानगी देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.
भगवानगड दसरा मेळाव्यावरून समर्थकांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 5:03 AM