आॅनलाईन लोकमतजामखेड, दि़ ८ - मुख्याधिकारी व तीन कर्मचाऱ्यांनी चाकूने आपल्यावर वार केल्याचा दावा नगरसेवक संदीप गायकवाड यांनी केला असून, गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत़ तर नगरसेवक गायकवाड यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद मुख्याधिकारी एऩ के़ पाटील यांनी पोलिसात दिली आहे़ मुख्याधिकारी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. ७) पाटील हे दैनंदिन काम आटोपून शिक्षक कॉलनीत असलेल्या घरी गेले होते. रात्री ७.४३ वाजता नगरसेवक संदीप गायकवाड यांच्या मोबाईलवरून मुख्याधिकारी एऩ के़ पाटील यांना फोन आला़ तुम्ही जामखेडच्या चौकात या माझे काम आहे. त्यावेळी मुख्याधिकारी नगरसेवक गायकवाड यांना म्हणाले की, ‘तुमचे काय काम असेल ते कार्यालयीन वेळेत सांगा़ ते सकाळी पाहू़’ याचा राग गायकवाड यांना आला. त्यांनी तुम्ही येत नसाल तर मीच घरी येतो, असे म्हणून फोन बंद केला व दोन अनोळखी इसम घेऊन मुख्याधिकारी एऩ के़ पाटील यांच्या शिक्षक कॉलनी येथील घरी गेले. तेथे संदीप गायकवाड व मुख्याधिकारी पाटील यांच्यामध्ये वाद झाला़ गायकवाड यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत पाटील यांनी म्हटले आहे़ या फिर्यादीवरुन पोलीसांनी नगरसेवक संदीप गायकवाड व इतर दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता मुख्याधिकारी एऩ के़ पाटील हे नगरपरिषदेमध्ये आले होते. काही वेळात पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे व त्यांचे सहकारी हे पंचनामा करण्यासाठी मुख्याधिकारी यांना घेऊन त्यांच्या शिक्षक कॉलनी येथील घरी गेले. पंचनामा आटोपल्यावर मुख्याधिकारी पुन्हा नगरपरिषदेमध्ये कामकाज करण्यासाठी आले़ दरम्यान अकरा वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संदीप गायकवाड हे जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी डोक्याला मार लागून अंगावरील शर्टावर रक्त सांडलेल्या अवस्थेत आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर गायकवाड यांनी माध्यमांशी व इतर लोकांशी बोलताना सांगितले की, नगरपरिषद इमारतीच्या पाठीमागील बाजूस मुख्याधिकारी एऩ के़ पाटील व त्यांच्याबरोबर असलेले कर्मचारी शंकर बोराटे, राजेंद्र गायकवाड व इतर तीन कर्मचाऱ्यांना विकासकामांबाबत बोलत असताना त्यांनी चाकूने मारहाण केली़ त्यांच्या तावडीतून जीव वाचवून मी पोलिसांत आलो़ परंतु पोलिसांनी मला दवाखान्यात पाठवले़ तेथून गायकवाड यांनी पुढील उपचारासाठी नगर गाठल्याचे सांगण्यात येते़नगरसेवकावर चाकू हल्ला केल्याबाबत मुख्याधिकारी एऩ के़ पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, तो खोटा आरोप करतो आहे़ त्यानेच मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे़ मी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे़
नगरसेवक-मुख्याधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला; नगरसेवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2017 2:48 PM