अहिल्यानगर: श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज मंदीर जीर्णोद्धार प्रश्नावर आजपासून यात्रोत्सव समितीने श्रीगोंदा शहर बेमुदत बंदची हाक दिली आहे. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिवसभर यात्रा समिती व ट्रस्टी यांच्यात समझोता घडवण्यासाठी बैठका झाल्या. मात्र, यातून काहीच फलित निघाले नाही. त्यामुळे आता दर्गा नव्हे तरच मंदिरच होणार अशी भूमिका यात्रा समितीने घेतली असून या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
बैठकीला आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार बबनराव पाचपुते, राहूल जगताप, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, पोपटराव खेतमाळीस, आमीन शेख, गोपाळराव मोटे, तहसीलदार प्रविण मुदगल, पोलिस निरीक्षक किरणकुमार शिंदे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, नायब तहसीलदार पंकज नेवसे, अशोक आळेकर, नवनाथ दरेकर, शहाजी खेतमाळीस, सुदाम झुंझरुक आदी उपस्थित होते. दुपारी १ वाजता यात्रा समिती व ट्रस्ट सदस्यांना तहसीलदार कार्यालयात निमंत्रीत करण्यात आले होते. मात्र, हजरत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष आमीन शेख व सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यानंतर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ट्रस्टचे अध्यक्ष आमीन शेख यांच्याबरोबर बैठक केली आणि श्रीगोंदेकरांच्या भावना विचारात घेऊन दोन पावले मागे घ्या, मंदिर जीर्णोद्धारसाठी मी निधी उपलब्ध करुन देतो. तुम्ही आणि यात्रा समिती एकत्र काम करा, असे त्यांनी सांगितले. त्यास ट्रस्ट सदस्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर रात्री आठ वाजता यात्रा समिती सदस्य व ट्रस्ट सदस्यांची बैठक झाली.
यावेळी ट्रस्टच्यावतीने आमीन शेख म्हणाले हजरत शेख महंमद बाबा दर्गाह ऐवजी मंदिर असा नावात बदल करू पण अध्यक्ष मीच राहील आणि आमदारांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व आमचे दोन व यात्रा समितीचे दोन सदस्य असलेली समिती जीर्णोद्धाराचे काम होईपर्यंत काम करेल. कामे झाले की, ही समिती बरखास्त करा. तसेच मंदिर देखभाल ट्रस्टकडे राहील. यात्रा समितीने हरजत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट बरखास्त करा आणि मंदिराचे पावित्र्य राखणे व जीर्णोद्धारसाठी शेख परिवाराने मंदिर परिसरातील जागा तत्काळ मोकळी करुन द्यावी एवढीच भूमिका घेतली. ही भूमिका ट्रस्ट सदस्यांनी अमान्य केली. दरम्यान, "संत शेख महंमद महाराज मंदीर जीर्णोद्धार होणे, हा श्रीगोंदेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण हा विषय सोडवण्यासाठी ट्रस्ट व यात्रात्सव समितीने न्याय भूमिकेतून चर्चा करावी. यातून प्रश्न सुटेल आणि मंदिर जीर्णोद्धारही होईल," अशी भूमिका आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मांडली आहे.