लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : साईसंस्थानने नवीन दर्शनपासेस पॉलिसी, डोनेशन पॉलिसी, रक्तदान पॉलिसी, साईमंदिर निर्माण पॉलिसी, देशव्यापी मंदिर असोसिएशनची स्थापना आदीं घोषणा केल्या आहेत. या सर्व योजनांबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भाविक व ग्रामस्थांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. यासंदर्भात
संस्थानचे सीईओ पी. शिवा शंकर यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साईमंदिर परिसरात भाविकांकडून रक्तदान केले जाते. यापुढे दानात मिळालेले रक्त रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. येथे काही बाहेरील रक्तपेढ्याही रक्तसंकलन करतात. त्यांनाही हे रक्त मोफतच द्यावे लागणार आहे. याबाबत संस्थानकडून संबंधित रुग्णांशी संपर्क करून खातरजमा करण्यात येणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल व नॉट फॉर सेल लिहिलेले असेल.
काल एका माजी नगरसेवकाने भाविकांना पास विकण्याच्या पार्श्वभूमीवर संस्थानने पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे पोलिस मंदिर परिसरात फिरणाऱ्या व भाविकांची दिशाभूल करणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन कारवाई करणार आहेत. वारंवार कुणावर कारवाई झाली तर त्याच्या हद्दपारीसाठी जिल्हाधिकारी व पोलिसांना संस्थानकडून पत्र दिले जाणार आहे.
साईंच्या शिकवणुकीच्या प्रचार, प्रसारासाठी साईसंस्थानने देशभर साई मंदिर उभारणीत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साईसंस्थान शिर्डीसारखेच मंदिर उभारणार आणि चालवणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिरांनाही पन्नास लाखांपर्यंत मदत करण्याचा संस्थान विचार करत आहे.
यापुढे भाविक ज्या प्रमाणात देणगी देतील, त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ठरावीक आरती व दर्शनाची सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संस्थान युनिक आयडी कार्ड बनणार आहे. यापूर्वी साईसमाधीवर शाल पांघरण्यासाठी सोडत पद्धत अवलंबिण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करून देण्याबाबत संस्थान विचार करत आहे.
भाविकांचे आधारकार्ड, मोबाइल नंबर घेणारदेशभरातील साईमंदिरांची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही साईसंस्थानचा विचार सुरू आहे. आरती व दर्शनपासेसमध्ये होणारा गैरवापर रोखण्यासाठी साईंच्या आरतीच्या सशुल्क पासेससाठी शिफारस करताना यापुढे सर्व भाविकांची आधार कार्ड व मोबाइल नंबर द्यावे लागणार आहेत. पासेस कन्फरमेशनबाबत संबंधित भाविकाच्या मोबाइलवर मेसेज पाठवला जाणार आहे. येत्या शुक्रवारपासून प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. टोकन नंबरसाठी बुकिंग केल्यावर भाविकांना मेसेज पाठवला जाणार आहे.