अहमदनगर : ‘लोकमत’ सरपंच अॅवॉर्ड विजेत्या पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविल्यास त्यांना पणन विभागाकडून बाजार ओटे बांधण्यासाठी तत्काळ अनुदान देऊ, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली़ रोजगार निर्मितीसाठी ग्रामपंचायतींनी काही प्रकल्प हाती घेतल्यास दहा लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणाही त्यांनी केली.
अहमदनगर येथे ‘लोकमत’ सरपंच अॅवॉर्ड सोहळा मंत्री देशमुख व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात कामगिरी करणाºया तेरा सरपंचांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘लोकमत’ने राज्यात हा आदर्श उपक्रम सुरु केला आहे. ‘लोकमत’ चा पुरस्कार मिळालेल्या सरपंचांना शासनानेही प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी या सोहळ्यात आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मंत्री देशमुख यांच्याकडे केली. देशमुख यांनी त्यावर लगेच सकारात्मक भूमिका घेत वरील घोषणा केली. नगरसह राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘लोकमत’ अॅवॉर्ड मिळालेल्या पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ओटे बांधण्यासाठी अनुदान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’ने रोजगारनिर्मिती करणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांनाही पुरस्कार सुरु केले आहेत. तो धागा पकडून त्यांनी रोजगार निर्मितीचे काम करणाºया पंचायतींना कर्ज देण्याची घोषणा केली.
‘लोकमत’च्या सरपंच अॅवॉर्ड उपक्रमाचे देशमुख यांनी कौतुक केले. पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘असे बदलू गाव’ या विषयावर पोपटराव पवार, राष्टपती पुरस्कार विजेते सरपंच भास्करराव पेरे पाटील (औरंगाबाद) व नागपूर जिल्ह्यातील शीतलवाडीच्या युवा सरपंच योगिता गायकवाड यांनी सरपंचांशी संवाद साधला. ‘बीकेटी टायर्स’ हे या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक तर पतंजली प्रायोजक व महिंद्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक आहेत.‘लोकमत’ने उणीव शोधली: मंत्री शिंदेशासनाने आजवर ग्रामपंचायतींसाठी पुरस्कार दिले. मात्र, सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारी योजना नव्हती. ‘लोकमत’ने ही उणीव शोधून अशी पुरस्कार योजना सुरु केली आहे. हा अभिनव व प्रेरणादायी सोहळा असल्याचे मंत्री राम शिंदे म्हणाले.