श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : सहकारातील ४८ हजार कोटी रुपयांचा घोटाळ्यात नाबार्डची चौकशी पूर्ण झाली आहे. केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही सरकारमध्ये सामील झालेल्या राज्यातील नेत्यांवरील कारवाई अटळ आहे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तुर्तास अटकेपासून बचाव करण्यासाठी हे नेते भाजपबरोबर गेले असून त्यात नगर जिल्ह्यातील नेत्यांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी संध्याकाळी उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. देशात लवकरच लोकसभेची निवडणूक जाहीर होईल, असे भाकित त्यांनी यावेळी केले.आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने नामार्डच्या माध्यमातून पैसे दिले होते. त्यामुळे केंद्राने ४८ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली आहे. केवळ सहकार विभागाने ही बाब मान्य केलेली नाही. मात्र उद्या केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही कायद्याने कारवाई थांबणार नाही.राज्यात शिवसेनेच्या बळावरच भाजपला ग्रामीण मतदारांवर प्रभाव टाकता येत होता. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकांमध्ये विजयी झाले. आता मात्र भाजपकडे कोणतेही प्रभावशाली नेतृत्व राहिलेले नसून हा पक्ष येत्या विधानसभेला सपाटून मार खाणार आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.अजित पवार ५ टक्केही नाहीतज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तुलनेत अजित पवार यांची क्षमता पाच टक्के सुद्धा नाही. शरद पवार यांनी सन्मानाने राजकारणातून निवृत्त व्हायला हवे, असे मानणारा मोठा वर्ग आहे. तो अजित पवार यांना कधीही स्वीकारणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.
सहकार घोटाळा दबणार नाही, कारवाई होणारच, सरकार बदलले तरीही फरक नाही - प्रकाश आंबेडकर
By शिवाजी पवार | Published: August 10, 2023 1:10 PM