केडगाव : कोरोना आजाराला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग एकाकी झुंज देत आहे. गाव पातळीवर असणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांनी समन्वयाने काम करून त्यांना मदत करावयाची आहे. तरच कोरोना आटोक्यात येईल, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड यांनी केले.
सभापती गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच यांची नुकतीच ऑनलाइन सभा घेण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या.
गुंड म्हणाल्या, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोविडची लागण होऊन कधी नव्हे एवढे भयानक संकट समाजावर ओढविले आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी गाव पातळीवरील सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. आज फक्त आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग प्रत्यक्ष काम करताना दिसत आहे. आरोग्य आणि ग्रामविकास विभाग यांच्यावर खूप मोठा ताण आहे. या परिस्थितीमध्ये या तिन्ही विभागांना इतर विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांनी साथ देणे आवश्यक आहे. गावातील शिक्षक, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, बांधकाम विभाग या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन या संकटावर मात करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.
गावातील पदाधिकाऱ्यांनीही राजकारण बाजूला ठेवून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांबरोबर किंवा त्याच्याही पुढे जाऊन काम करणे गरजेचे आहे. गाव पातळीवर विलगीकरण कक्ष स्थापन करावे. तेथे शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. कोरोनाची लागण झालेले रुग्ण विलगीकरण कक्षात येत नसतील तर त्यांना समज द्यावी. ऐकत नसतील तर पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी, अशी तंबी या वेळी ग्रामसेवकांना देण्यात आली.