अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील वृद्धेश्वर कॉलेजमध्ये बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला एक कॉपीबहाद्दर आढळून आला़ त्याच्याविरोधात कॉपी केस करण्यात आली असून, इतरत्र परीक्षा सुरळीत पार पडली.गुरुवारी (दि़२१) बारावीची बोर्ड परीक्षा सुरु झाली़ परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने ११ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे़ तसेच इंग्रजी व गणिताच्या पेपरला बैठे पथक ठेवण्यात आले आहे़ परीक्षा सुरु झाल्यानंतर १२ वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथील वृद्धेश्वर कॉलेजमध्ये उपशिक्षणाधिकारी रामदास खेडकर यांच्या पथकाला एका परीक्षार्थीकडे कॉपी आढळून आली़ त्याच्याकडील कॉपी हस्तगत करुन पहिला पेपर ताब्यात घेण्यात आला़ त्या परीक्षार्थीला पुन्हा दुसरा पेपर देऊन परीक्षा देण्यास अनुमती देण्यात आली.दरम्यान विनाअनुदानित शिक्षकांनी बारावीच्या परीक्षेचे कामकाज करण्यावर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेसाठी नेमलेल्या पर्यवेक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांचेही पर्यवेक्षक म्हणून ऐनवेळी नियोजन केले होते़ परंतु परीक्षेच्या वेळी कोठेही पर्यवेक्षक कमी जाणवले नाहीत़ त्यामुळे शिक्षण विभागाने केलेल्या नियोजनावर विनाअनुदानित शिक्षकांच्या बहिष्काराचा परिणाम जाणवला नाही, असा दावा माध्यमिक शिक्षण विभागाने केला आहे.