चंद्रकांत शेळके
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाने प्रत्येक क्षेत्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम केला आहे. त्यात रक्तदान चळवळ कोरोनामुळे कोलमडली असून रक्ताचा मोठा तुटवडा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. सार्वजनिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, तसेच महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान करणारा तरूण वर्ग घरात असून त्याचा रक्तसंकलनावर ६० ते ७० टक्के परिणाम झाला आहे. यात भर म्हणजे आता कोरोनाची लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग पाठ सोडताना दिसत नाही. लाॅकडाऊनमध्ये सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, ग्रामीण भागातील जत्रा, यात्रा, मोठी मंदिरे, तसेच महाविद्यालये बंद असल्याने रक्त संकलनावर आपोआप परिणाम झाला. रक्तदान करणारा वर्ग बहुतांश तरूण असतो. पूर्वी विविध कार्यक्रमात रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलित केले जायचे. एमआयडीसीमध्येही अनेक कंपन्यांकडून कामगारांची रक्तदान शिबिरे व्हायची, परंतु कोरोनामुळे या कार्यक्रमांवर बंधने आली. परिणामी रक्त संकलनात कमालीची घट आली आहे.
-------
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी रक्तदान
आता कोरोना लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही. दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे रक्ताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, असे माहिती तज्ज्ञांकडून मिळाली.
----------
दररोज किती जणांना दिली जाते लस? - १५००
आतापर्यंत लसीकरण - सुमारे ६० हजार
जिल्ह्यात एकूण ब्लड बॅंक - १४
---------------
कोरोनाच्या काळात मोठा परिणाम रक्त संकलनावर झाला. सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने रक्तदान शिबिरे घेता आली नाहीत. महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना रक्तदान करता आले नाही. त्यामुळे ७० टक्के रक्त संकलन नेहमीच्या तुलनेत कमी झाले आहे.
- राजू पवार, प्रमुख, अहमदनगर ब्लड बँक
------------
कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन घटले आहे. लसीकरणाचा परिणाम लगेच रक्त संकलनावर जाणवणार नाही. उलट येत्या काळात ज्यांनी लस घेतली त्यांना रक्तदान करण्याचा आत्मविश्वास येईल.
- मुकेश साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जनकल्याण रक्तपेढी
-------
फोटो - १७ब्लड डमी १,२,३,४,५,६,७.