केडगाव : कधी कोरोना, कधी अवकाळी, कधी मजुरांची टंचाई तर कधी बाजारभावाची घसरण अशा या ना त्या अडचणींचा सामना करणाऱ्या नगर तालुक्यातील छोट्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता कांदा बाजार सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. गेल्या महिन्यापासून नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव बंद असल्याने पावसामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. निम्मा कांदा शेतातच सडत चालल्याने शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढली आहे.
नगर तालुक्यात सध्या कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. नगर बाजार समितीचा नेप्ती उपबाजार कांदा लिलावासाठी राज्यात अव्वल आहे. तालुक्यासह परजिल्ह्यातूनही येथे कांदा विक्रीसाठी येतो. नेप्ती उपबाजार येथे सोमवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस कांदा लिलाव चालतो. दरवेळी सरासरी ४० ते ५० हजार कांदा गोण्यांची येथे आवक सुरू असते. कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १ मेपासून कांदा मार्केट बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने महिनाभर कांदा लिलाव होऊ शकला नाही.
यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा लागवड उशिरा झाली होती. काहींना पुनर्लागवड करावी लागली. त्यात बऱ्याच शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाल्याने त्यांनाही पुन्हा लागवड करावी लागली. यामुळे कांद्याच्या काढण्या उशिरा झाल्या. वर्षभर कोरोनाची भीती त्यात मजूर मिळत नसल्याने खुरपणी, लागवड, काढणी या सर्वच कामांना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. त्यात सततच्या अवकाळी व ढगाळ वातावरणाने कांदा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. जेमतेम ५० टक्के उत्पादन निघाले. मजूर नसतानाही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची काढणी केली. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या महिन्यापासून नेप्ती बाजार बंद आहे. त्यात पावसाळा सुरू झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडत चालला आहे. ज्या छोट्या शेतकऱ्यांना कांदा साठविण्याची व्यवस्था नाही. त्यांची सध्या पावसामुळे कांदा झाकण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी धावपळ उडत आहे.
---
वर्षभर कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत होते. आता कांदा बाजार बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांना कांदा चाळ नाही किंवा ज्यांचा शेतातच कांदा पडून होता. त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे सरकारने कांदा बाजाराचे निश्चित धोरण ठरवावे. नियम घालून देऊन बाजार वर्षभर सुरू राहील याची व्यवस्था करावी. शेतकरी संघटित नसल्याने त्यांना सगळीकडून याचा फटका बसत आहे. अनुदान नको पण कांद्याचे भाव चांगले असावे तरच कांदा उत्पादक जगेल.
- रमेश ठोंबरे,
शेतकरी, वडगाव तांदळी
-----
माझा ४०० गोणी कांदा शेतात पडला आहे. कांदा बाजार सुरू होण्याची वाट पाहत होतो. आता पावसामुळे यातील निम्मा कांदा भिजला आहे. सरकारने नुकसानभरपाई द्यावी. एक तर उत्पादनाचा खर्च निघत नाही. त्यात नुकसान यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
- संतोष कोतकर,
शेतकरी, गुंडेगाव
----
सध्या पावसामुळे कांदा झाकण्यासाठी पळापळ होत आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला माल जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. खरीप पेरणीसाठी बियाणे, खते यांची जुळवाजुळव करायची आहे. मार्केट बंद असल्यामुळे शेतात पडलेला माल टिकायचा कसा व विकायचा कसा, असा प्रश्न आहे.
- गोवर्धन पवार,
शेतकरी, साकत खुर्द
---
बाजार समित्या बंद असल्याने साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याची व सडण्याची शक्यता असल्याने काहीच दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने मिळेल त्या भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. उत्पन्न अथवा वाहतुकीचा खर्चदेखील निघणार नसून त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठ्या संकटाची स्थिती निर्माण झाली आहे.
- सचिन सदाशिव कुताळ,
कांदा उत्पादक, गुंडेगाव
---
शेतकरी व व्यापारी यांची जशी कांदा बाजार सुरू करण्याची मागणी आहे, तशीच ती नगर बाजार समितीची आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन कांदा खराब होऊ नये यासाठी आम्ही नेप्ती उपबाजार सुरू करण्याची मागणी करीत आहोत. लवकरच कांदा बाजार सुरू होईल, अशी शक्यता आहे.
- अभय भिसे,
सचिव, नगर बाजार समिती
310521\img-20210530-wa0153.jpg
कांद्याचा वांदा