केडगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्केटमध्ये वेळेची मर्यादा, शेतकऱ्यांची संभ्रमावस्था आणि लॉकडाऊन यामुळे नगर बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून धान्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. दरही घसरले आहेत. सध्या चिंच वगळता इतर अन्नधान्याचे मार्केट बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचा माल घरीच पडून आहे.
मे महिन्याच्या अखेरीस खरीप हंगामाची लगबग सुरू होते. शेतीची मशागत करण्याच्या कामाला वेग येतो. रबी हंगाम संपून महिना लोटला. मागील मोसमात पाऊस जास्त झाल्याने यंदा रबी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा यांचे समाधानकारक उत्पादन निघाले. नगर तालुक्यात ज्वारीचे ७०० मेट्रिक टन उत्पादन मिळाले तर गव्हाचे २६३ मेट्रिक टन उत्पादन मिळाले. मात्र, हंगाम संपताच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने त्याचा परिणाम नगर बाजार समितीमधील धान्याच्या व्यापारावर झाला. त्यात मार्केट सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना या वेळेत आपले धान्य विक्रीसाठी आणणे शक्य होत नाही. याचा परिणाम धान्याची आवक मंदावली आहे. तसेच भावातही काहीशी घसरण झाली आहे. आता १० मेपर्यंत चिंच वगळता इतर मार्केट बंद झाले आहेत.
...................
धान्याची आवक व दर
ज्वारी गावरान = ५ क्विंटल दर - ३२५०
हरभरा = २० क्विंटल
दर- ४८००
गहू = ३० क्विंटल
दर- १७२५
चिंच = ३४५ क्विंटल दर - ७०००
............
यंदा पाऊस वेळेवर पडल्यामुळे गव्हाचे पीक चांगले आले. मात्र, यावर्षी गव्हाला अवघा १६०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता. बाजार वाढेल या आशेने गहू ठेवला; परंतु लॉकडाऊनमुळे आता मार्केट बंद आहे. त्यामुळे विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-शरद रावसाहेब निमसे, शेतकरी, साकतखुर्द
..............
सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे.
लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. गावरान कांदा शेतात पडून आहे. गहू तयार झाला आहे; परंतु मार्केट बंद असल्याने विक्रीसाठी पाठवता येत नाही. उन्हाळ्यात टँकरने पाणी टाकून लिंबाची बाग जगविली; परंतु लिंबू विक्रीसाठी बाजारपेठ सुरू नसल्याने बागेतच लिंबू सडत आहेत. त्यामुळे जगावे तरी कसे, असा प्रश्न पडला आहे.
-बाळासाहेब सोपान तवले, शेतकरी, जेऊर
.............
सध्या धान्याचे मार्केट बंद आहे. आवक अतिशय कमी होती. सध्या फक्त चिंचाचे मार्केट सुरू आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याने शेतकरी धान्य आणत नाहीत. दरही स्थिर आहेत.
-विजय कोथंबिरे, व्यापारी
..............................
कोरोनामुळे मार्केटमध्ये वेळेची मर्यादा होती. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल मार्केटमध्ये आणणे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम आवक कमी होण्यात झाला. शेतकरीही माल मार्केटमध्ये आणण्यास घाबरत आहेत. आता लॉकडाऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरच धान्याचे मार्केट सुरळीत होईल.
-शिवाजी आंबेकर, व्यापारी