कोतूळ : कोतुळात अवैध देशी दारू विक्री परिसरात गेल्या महिन्याभरात कोरोनाने दहा लोकांना जीव गमवावा लागला तर अनेकांना कोरोना मुक्त होण्यासाठी लाखोंचा खर्च आला आहे.
कोतूळ, ब्राम्हणवाडा, राजूर, सुगाव येथील कोविड सेंटरमध्ये ऐंशी टक्के रूग्ण करंडी, केळी ओतूर, केळी कोतूळ, फोपसंडी, सातेवाडी, खेतेवाडी, फोपसंडी पळसुंदे, तळे, विहीर, लिंगदेव, लहित, चास येथील आहेत. विशेष म्हणजे यातील सातेवाडी परिसरातील अनेक तळीराम कोतूळ येथील बसस्थानक, इंदिरा नगर परिसरात अवैध दारू विक्री अड्ड्यावर तळ ठोकून असतात. कोतूळ येथील बसस्थानक परिसरात गेल्या महिन्यात सहा लोक कोरोनाने मृत्यू पावले. याच परिसरात वडापाव, किराणा, भाजी व्यापारी व गोरगरीब कुटुंबातील कोरोना बाधितांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
हीच परिस्थिती इंदिरा नगर परिसरातही आहे. बाधित संख्या मोठ्या प्रमाणात तर चार मृत्यू झाले. लहित लिंगदेव, लहित, वाघापूर, सावरचोळ फाटा परिसरात देखील या अवैध दारू विक्रेत्यांनी घरोघर कोरोना पोहोचवला आहे.
विशेष म्हणजे दररोज सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत कोतुळात बसस्थानकासमोर घरासमोर खुर्च्या टाकून दारू विक्री होते. दररोज येथे दोनशे लोक दारू घ्यायला येतात आणि हेच लोक पुन्हा खेड्यापाड्यात जातात. परिणामी तेथेही रूग्णांचा आकडा वाढला आहे.
कोतुळात पोलीस मुख्य चौकात खडा पहारा देतात मात्र बसस्थानक परिसरातील अवैध दारू विक्री दिसत नाहीत? एरवी एखादा किरणा, कापड, भाजी व्यापाऱ्याने दुकान उघडले तर ग्रामसेवक, पोलीस ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलिसांचे हस्तक दुकाने बंद करून दंड करतात मग अवैध दारू विक्रीकडे का जात नाहीत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
.............
उसाच्या शेतातील गांजा सापडताे पण दारू विक्री दिसत नाही
अकोलेत जंगलातील उसाच्या शेतात असलेला गांजा पोलिसांना सापडतो मात्र कोतूळ, लहित, वाघापूर, लिंगदेव, सावरचोळ फाटा, कोहणे येथील अवैध दारू विक्री कशी दिसत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागे मोठा राजकीय हात की व्यवहार यावर चर्चा झडत आहेत.