श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात कोरोनाने मृत्यू झालेल्या २१४ जणांवर येथील वेगवेगळ्या स्मशानभूमीत येथील नगरपालिकेच्या नऊ जणांच्या टीमने अंत्यसंस्कार करून अखेरचा निरोप दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत श्रीगोंदा शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले. अनेक जण मृत्युमुखी पडू लागले आहेत. शहरातील अमरधाम, दफनभूमीमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या नागरिकांवर अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली.
पालिकेचे कर्मचारी कोरोना बाधित नागरिकावर अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हते.
परंतु, पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, मोहन लोंढे यांनी या कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविला. त्यांना विमा संरक्षण दिले. आकाश घोडके, विशाल काळे, सूरज घोडके, शरद घोडके, संतोष रंधवे, वाल्मीकी काळे, मयूर घोडके, आकाश ससाणे, सोपान धुमाळ (चालक) यांची टीम तयार झाली.
शहर परिसरात २१४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. अशा मयतांवर त्यांच्या टीमने अंत्यसंस्कार केले. यामध्ये एप्रिल महिन्यात एकाच दिवशी ११ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली होती. तो दिवस मन सुन्न करणारा होता, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली.
---
नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या कुटुबांची चिंता न करता कोरोनाबाधित मयतांवर अंत्यसंस्कार केले. यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. मृतांची अवहेलना होऊ दिली नाही.
-मंगेश देवरे,
मुख्याधिकारी, श्रीगोंदा
---
कोरोनामुळे श्रीगोंदा शहरातील मृत्यूचा आकडा वाढला होता. अशा परिस्थितीत पालिकेच्या नऊ कर्मचाऱ्यांनी कधीच आळस न करता अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पार पडली. या कामगिरीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
-नितीन खामकर,
तालुका वैद्यकीय अधिकारी,
---
सुरुवातीला आम्हाला भीती वाटत होती. मात्र देवरे, खामकर, लोंढे यांनी पाठीवर हात ठेवला. आमचे मनोबल वाढविले. आता अमरधाममध्ये भीती वाटत नाही. आता आम्ही कधी कधी जेवणही अमरधाममध्येच करतो. वर्षभरातील अशा कठीण प्रसंगाची आठवण झाली तर मन व्याकुळ होते.
-आकाश घोडके,
कर्मचारी, नगरपालिका
---
फोटो आहे.