सुपा : कोरोनामुळे दोन वर्षांपासून सुपा (ता. पारनेर) परिसरातील यात्रा लॉकडाऊनच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे पाहुण्यांची सरबराईही थांबली असून, गावकारभाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
पारनेर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून वाळवणे येथील भैरवनाथांची यात्रा प्रसिद्ध आहे. नगर व पुणे जिल्ह्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील भाविकांच्या उपस्थितीने व्यापक स्वरूपात हा यात्रोत्सव, कुस्त्यांचे फड येथे रंगतात. त्याबरोबर जवळच असणाऱ्या जातेगाव, आपधूप, पिंप्री गवळी, रायतळे, अस्तगाव या गावातही त्यांच्या ग्रामदैवतांचा यात्रोत्सव असला तरी कोरोनामुळे या यात्रा जत्रा गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी लॉकडाऊनच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. साहजिकच या उत्सवाचे आयोजन नियोजन व कार्यवाही करणाऱ्या गावकरभाऱ्यांच्या उत्साहावर त्यामुळे पाणी फिरले आहे. कोरोनाच्या पुनरागमनाने व त्यातील दुर्घटना, इंजेक्शन मिळत नाही. कुठे बेड नाही तर काही ठिकाणी ऑक्सिजन नसल्याने रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या जीवघेण्या धावपळीच्या बातम्यांनी जीव कासावीस होत असल्याने ‘नको रे बाबा’ ही महामारी त्यासाठी यात्रा बंदी केलेली बरी असे गावच्या कारभारी मंडळीमधून बोलले जातेय, असे भैरवनाथ देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सचिन पठारे यांनी सांगितले.
सुपा परिसरातील यात्रांचे वैशिष्ट्य म्हणजे जवळच्या नातेवाईकांना, घरातील सर्व सदस्यांना यात्रेसाठी खासकरून गावी बोलावून घेतले जाते. सर्वांच्या उपस्थितीने एक चांगला सुसंवाद त्यानिमित्ताने घडतो. वैचारिक देवाणघेवाण होते. यामुळे नात्यातील वीण घट्ट व मजबूत होत असल्याचे सुरेश थोरात यांनी सांगितले. गावातील जत्रेसाठी तेथील लोक आवर्जून पाहुण्यारावळ्यांना आमंत्रण देऊन बोलावून घेतात. येत्या आठवड्यातच दोन दिवसानंतर एकामागोमाग एक या यात्रा असून चैत्र महिन्यातच गेल्या वर्षी व याही वर्षी लॉकडाऊन असल्याने दोन वर्षांपासून यात्रा, त्यानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका, शोभेचे दारूकाम, मिठाईची दुकाने, खेळणी, घरगुती व शेतीकामाच्या छोट्या-मोठ्या वस्तूची खरेदी-विक्री बंद झाली व पर्यायाने छोटे-मोठे व्यावसायिक यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि.२७) जातेगाव येथील भैरवनाथ तर त्याच दिवशी आपधूप येथेही यात्रा असते. वाळवणे येथील भैरवनाथांची जत्रा या वर्षी बुधवारी (दि.२८) आहे. परंतु, लॉकडाऊन, संचारबंदी आदेश यामुळे ही यात्रा व कुस्त्यांचा फड असे दोन्ही कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती विश्वस्त समिती अध्यक्ष सचिन पठारे यांनी दिली. दोन वर्षांपासून कोरोनाची भीषण छाया पसरली असल्याचे वाळवणेच्या सरपंच जयश्री पठारे यांनी सांगितले.