अहमदनगर : मुंबईत नोकरीला असलेली ५७ वर्षीय व्यक्ती आपल्या मूळ अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे आली असता कोरोनाची शिकार झाल्याचे समोर येत आहे. या व्यक्तीचा खासगी लॅबकडून आलेला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता शासकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा रूग्णालयात हलवले असल्याची माहिती अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली.
मुंबईत शिक्षक असलेला हा ५७ वर्षीय व्यक्ती आपल्या मुलासह १० दिवसांपूर्वी लिंगदेवला आला होता. तेथे तो मुलासह क्वारंटाईन असल्याचे समजते. परंतु १० दिवसांनंतर त्याला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने संगमनेर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तो दाखल झाला. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला दाखल करून न घेता खासगी लॅबकडून तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पुण्याच्या एका लॅबने त्याच्या घरी येऊन स्वॅब घेतले. त्याचा अहवाल शनिवारी सकाळी आला असता तो पॉझिटिव्ह निघाला.ही माहिती समजताच अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकाºयांनी लिंगदेव गाठले. त्वरित संबंधित रूग्ण व त्याच्या मुलाला ताब्यात घेऊन जिल्हा रूग्णालयात रवाना केले. जिल्हा रूग्णालयात तपासणी झाल्यानंतरच तो कोरोना बाधित आहे का याची अधिकृत स्पष्टता होणार आहे. दरम्यान, तो गावात क्वारंटाईन असला तरी त्याच्या संपर्कात कोणी आले का? याची माहिती घेऊन त्यांनाही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती तहसीलदार कांबळे यांनी दिली.