केडगाव : कोरोनाचा दुसरा टप्पा केडगावकरांची पाठ सोडायला तयार नाही. सध्या येथील कोरोनाा आवाक्याबाहेर चालला आहे. सध्या ३४८ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंतची रुग्णसंख्या साडेतीन हजारांच्या घरात गेली आहे. कोविड सेंटर नसल्याने रुग्णांचे हाल सुरू असून मृत्यूच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक बनली आहे.
केडगावमधील आरोग्य केंद्रात दररोज सरासरी २५० जणांच्या कोरोना तपासणी सुरू आहे. रोजच्या रुग्णसंख्येत ६० ते ७० रुग्णांची भर पडत आहे. येथे आतापर्यंत ४ हजार ६८४ जणांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी व तपासणीसाठी रोजच्या रांगा वाढतच आहेत. येथील सर्व खासगी दवाखाने कोरोनाबाधित रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. येथे दररोज ७ ते ८ रुग्णांचा मृत्यू होत असल्याने येथील परिस्थिती आता आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जात आहे. येथे किमान १०० ते २०० बेडचे कोविड सेंटर उभारणे गरजेचे असून महापालिका याबाबत ठोस निर्णय घेत नाही.
--
शाहूनगर, सुवर्णानगर बंद..
केडगाव परिसरात रुग्णसंख्या वाढत असल्याने शाहूनगर, सुवर्णानगर भाग प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. येथील सर्व दुकाने बंद केली असून येण्या-जाण्याच्या मार्ग, नागरिकांची ये-जा बंद करण्यात आली आहे. जुन्या केडगावमध्येही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केडगावमध्ये यापूर्वीच पाच भाग कंटेनमेंट घोषित करण्यात आले आहेत.
---
केंद्रीय पथकाकडून पाहणी...
केंद्रीय पथकाने शुक्रवारी केडगावमध्ये भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. लसीकरण व तपासणीबाबत सूचनाही केल्या. केडगावमध्ये सध्या दोन दिवस पुरेल इतक्याच लसी शिल्लक आहेत. या पथकात डॉ. गिरीश राव, डॉ. सुशील गुरिया, वरिष्ठ सल्लागार आरोग्य विभाग डॉ. राहुल शिंदे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, डॉ. गिरीश दळवी आदी उपस्थित होते.
--
केडगावची सद्य:स्थिती..
एकूण रुग्ण- ३,४३२, सक्रिय रुग्ण- ३४८, मृत्यू- ७ ते ८ (दररोज),
लसीकरण- ४,६४८, तपासणी- २५० (दररोज).
--
केडगावमधील कोरोनाची परिस्थिती अनियंत्रित होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येपुढे आमचे मनुष्यबळ कमी पडत आहे. केडगावची संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन गरजेचे बनले आहे. नागरिकांनीही या परिस्थितीचे गांभीर्य पाहून काळजी घ्यावी.
-डॉ. प्रशांत महाडुंळे,
केडगाव
--
केडगावमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहून येथे कोविड सेंटर उभारणे आवश्यक आहे. याबाबत मनपाकडे पाठपुरावा सुरू आहे.
-मनोज कोतकर,
नगरसेवक, केडगाव
---
०९ केडगाव
केंद्रीय पथकाकडून केडगावच्या परिस्थितीची पाहणी करण्यात आली.