लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी :
मार्च, एप्रिल महिन्यातील उगवणारा प्रत्येक दिवस राहाता तालुक्यासाठी मृत्यूची वार्ता घेऊनच उगवला. तालुक्यात कोरोनाने दोन महिन्यांत ६१ जणांचा बळी घेतला. गेल्या वर्षभरात कोरोनाने जेवढे बळी घेतले नाहीत, तेवढे बळी या दोनच महिन्यांत गेले. मृत्यूच्या बातमीशिवाय मार्च, एप्रिलचा एकही दिवस गेला नाही.
तालुक्याच्या इतिहासात असे दुर्दैवी महिने यापूर्वी कधीच पाहिले नाही, अशा प्रतिक्रिया आता ज्येष्ठांमधून उमटत आहेत.
राहाता तालुक्यात कोरोना बळींची संख्या केवळ दोन महिन्यांत दोन अंकी संख्येवर नेणाऱ्या मार्च, एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रसारही अत्यंत झपाट्याने झाला. कारण या दोन महिन्यांत तब्बल ९ हजार ८८६ नवे रुग्ण आढळले. दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दीडशे ते दोनशेपेक्षा अधिकच होती, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही दर दिवशी ३ पेक्षा अधिक होती. त्यातल्या त्यात २२ एप्रिल हा दिवस तर राहाता तालुक्यासाठी दुर्दैवी ठरला. तालुक्यात या एकाच दिवशी वर्षातील सर्वाधिक १० मृत्यू झाले. शिवाय दोनशेच्या वर नवे रुग्ण आढळले. आता मेमध्ये सतर्कता वाढवावी लागेल.
------------
पॉझिटिव्ह नको, सकारात्मक बना
पॉझिटिव्ह शब्दाची भीती नको, पण सकारात्मक विचार करा. मी मास्क नियमित घालतो, हात स्वच्छ धुतो म्हणून मला लागण होणार नाही. मी गर्दीत जात नाही, अकारण घराबाहेर फिरत नाही त्यामुळे कोरोनाचा धोका मला कमी आहे. कोरोनाची लक्षणे आढळली तर लगेच टेस्ट करून घेण्यास मी तयार आहे, अशी खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बाळगावी.
--------------
आरोग्य यंत्रणेच्या तत्परतेमुळे राहाता तालुक्यात मार्च, एप्रिल महिन्यात २९ हजार ८८१ जणांची कोरोना तपासणी केल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या इतर तालुक्यांपेक्षा वाढलेली होती. पण, त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही ८० ते ८२ टक्के इतके राहिले. यापुढील काळात कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनीच गांभीर्य ठेवले पाहिजे.
- डॉ. प्रमोद म्हस्के,
तालुका आरोग्य अधिकारी, राहाता
---------
दोन पत्रकारांचाही मृत्यू
दोन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांना कोरोनामुळे मुकावे लागले. यात राहाता, शिर्डी येथील दोन पत्रकारांचाही सामावेश आहे.