संगमनेर : शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे संगमनेरातील एका ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी (२४ जून) चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सदर महिलेवर नगर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ९७ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत दहा जणांचा तालुक्यात मृत्यू झाला आहे. आॅरेंज कॉर्नर येथील ५५ वर्षीय व्यक्ती, नवघर गल्लीतील २६ वर्षीय युवक , कोल्हेवाडी रस्ता येथील ४० वर्षीय व्यक्ती तर ठाणे येथून संगमनेरात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्ती अशा चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मृत्यू झालेली ३८ वर्षीय महिला ही शहरातील राजवाडा भागातील आहे. कोरोनाची लागण झालेल्या या महिलेवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या पार्थिवावर अहमदनगर येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तिच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.