नेवासा : कोरोना अनलॉकनंतर राज्यात सुरू होत असलेल्या दुसऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात लॉकडाऊन होणार, तसेच आठवडी बाजारही बंद राहणार असल्याच्या अफवेने नेवासा शहरातील जनता धास्तावली आहे. नेमके काय होणार, याबाबत साशंकता आहे.
नागरिकांनी अफवेवर विश्वास न ठेवता स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी केले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण आढळून आल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. काही ठिकाणी आठवडी बाजार बंद केला असल्याच्या बातम्या जनतेपर्यंत वेगाने पोहोचत असल्याने इतर जिल्ह्यांत कोरोना रुग्ण वाढत असून, या पार्श्वभूमीवर नेवासा शहरातील आठवडी बाजार बंद व दुकानांना वेळापत्रक ठरवून देणार असल्याच्या अफवांमुळे नेवासेकर नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झाली नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सुराणा यांनी केले.
काेराेनाबद्दल अफवा किंवा खाेटी माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. काेराेनाबद्दल चुकीची माहिती प्रसारित करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडतानाच मास्क लावावा. नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंगल कार्यालये व पेट्रोल पंप चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाढदिवस-दशक्रिया विधी यासाठी ३० व्यक्तींची परवानगी आहे. त्याचे उल्लंघन करू नये व त्या ठिकाणीसुद्धा सामाजिक अंतर पाळावे व मास्क वापरावा, असे आवाहन त्यांनी केले. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.
---
मास्क वापरण्याचे आवाहन
रविवारी सकाळी नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील व्यापारीपेठेत फिरून व्यापारी व नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र गुप्ता यांनी सांगितले.
---
तालुक्यात रुग्णवाढ होत नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता मास्क वापरावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.
अभिराज सूर्यवंशी,
तालुका आरोग्य अधिकारी, नेवासा
-----
२१ नेवासा काेरोना
नेवासा शहरात नगरपंचायतीचे कर्मचारी बाजारपेठेत फिरून व्यावसायिकांना सूचना देत होते.