अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी केले जात आहेत. एकाचवेळी अनेक रुग्णांवर अंत्यविधी होत असल्याने शहरभर धूर पसरतो. त्यामुळे अमरधाम येथील अंत्यविधी कमी करून ते सावेडी, केडगाव आणि नागापूर येथे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. मागील आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, दररोज ५५ ते ६० जणांवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी केले जात आहेत. त्यामुळे लाकडाचा धूर शहरभर पसरत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. आमदार संग्राम जगताप यांनी अमरधाम स्मशानभूतीतील विद्युत दाहिनीला मर्यादा असल्यामुळे बहुतांश अंत्यविधी हे माेकळ्या जागेत होतात. त्यामुळे नगरमध्ये दिवस-रात्र धूर पसरतो. या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ज्या तालुक्यातील मयत व्यक्ती आहे, त्याच तालुक्यात तालुक्यात अंत्यविधी करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बैठक घेऊन शहरातच इतर ठिकाणी अंत्यविधी करण्याचा आदेश दिला असून, या आदेशाची अंमलबजावणी रविवारी करण्यात आली. तसेच पुढील एक-दोन दिवसांत सावेडी येथील कचरा डेपोच्या जागेत स्मशानभूमी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, या जागेची पाहणी करण्यात आली आहे.
...
केडगाव स्मशानभूमीत अंत्यविधी
अमरधाम येथील स्मशानभूमीत अंत्यविधी न करता रविवारी केडगाव येथे १२ रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. उर्वरित कोरोना रुग्णांवरही अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, नागापूर व सावेडी, अशा दोन ठिकाणी कमी अधिक प्रमाणात अंत्यविधी केले जाणार आहेत.
- सादिक सरदार पठाण, कर्मचारी, महापालिका