कोपरगाव : मागील आठवड्यात लोणी येथील रहिवासी व कोपरगाव शहरातील एका विद्यालयातील लिपीक कोरोनाबाधित झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींपैकी कोपरगाव शहरातील एका महिला डॉक्टरचा कोरोनाचा अहवाल गुरुवारी (दि.४) रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. इतर १२ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहे, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर यांनी दिली. राहाता तालुक्यातील लोणी येथील बाधित व्यक्ती मागील आठवड्यात कोपरगाव येथील महिला डॉक्टर यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आली होती. त्यानंतर काही दिवसांनी लोणी येथील व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. त्याच्या संपर्कात आलेल्या कोपरगाव येथील १३ व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्या.
कोरोनाबाधित महिला डॉक्टर असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा प्रशासनाच्या वतीने शोध सुरु आहे. तब्बल दोन महिन्यानंतर कोपरगावात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या डॉक्टर महिलेने खासगी लॅबला टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसूनही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याचीही माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
दरम्यान कोपरगाव शहरातील काही बाधितक्षेत्र घोषित करण्यात आला असून तो सील केला आहे.