अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शुक्रवारी कोरोना चाचणी झालेल्यांची संख्या ५०९ इतकी होती. सलग दुसऱ्या दिवशीही ४५२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्ह येण्याचा दर वाढला असून तो २८ टक्क्यांवर गेला आहे. उपचार घेणाऱ्या (सक्रिय) रुग्णांची संख्याही दोन हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंता वाढली आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी (दि. १२) प्रत्येक जिल्ह्याचा ऑनलाइन आढावा घेतला. त्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक सहभागी झाले होते. त्यांनी या बैठकीत दिलेल्या माहितीनुसार २ ते ८ मार्च या कालावधीत नगर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट २८ टक्के असल्याचे सांगितले आहे. गत महिन्यात हाच दर १८ टक्के इतका होता. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा आदेश सचिवांनी दिला आहे. या चाचण्या आरटीपीसीआरद्वारे कराव्यात. प्रत्येक रुग्णाच्या संपर्कातील ३० जणांची चाचणी करावी, असेही आदेश दिले आहेत. नगर जिल्ह्याच्या सभोवताली असेलल्या पुणे, नाशिक, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील रुग्णांचा संसर्ग होणार नाही, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेशही मुख्य सचिवांनी दिले आहेत. जिल्ह्यातील राहाता आणि संगमनेर या दोन तालुक्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १८०, खासगी रुग्णालयात २३१, अँटिजन चाचणी ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशा एकूण ४०९ रुग्णांमध्ये अहमदनगर शहर (१२३), राहाता (७०), संगमनेर (४६), श्रीरामपूर (४६), कोपरगाव (३१), पारनेर (२८), कर्जत (१७), पाथर्डी (१५), नेवासा (१४), राहुरी (१२), अकोले (१०), अहमदनगर ग्रामीण (१०), जामखेड (९), श्रीगोंदा (७), शेवगाव (५), जिल्ह्याबाहेरील रुग्ण (९) येथील रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी ३६२ जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. सलग दोन दिवसांत सरासरी ४५० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. शनिवारी ती २ हजार २०३ पर्यंत वाढली आहे. शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या ११७२ इतकी झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या ७९ हजार ९८० इतकी झाली आहे.
------------------