लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची इस्त्रोला जाणारी शैक्षणिक सहल कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या शिक्षण समितीत घेण्यात आला. तसेच हैदराबाद येथे जाणारी सहलदेखील स्थगित करण्यात आल्याची घोषणा समितीकडून करण्यात आली आहे. ‘कोरोनाच्या दाढेत विद्यार्थ्यांना ढकलणार का?’ अशा मथळ््याखाली ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकातून लक्ष वेधले होते. त्यानंतर अधिकारी आणि पालकांनी ही बाब गंभीरपणे घेतली. त्यात याच वृत्ताच्या आधारे सभेच चर्चा झाली. अध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची सभा झाली. सभेस उपाध्यक्ष प्रताप शेळके, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे आदी उपस्थित होते. नोव्हेल कोरोना विषाणूची लागण देशातील काही राज्यात झाली आहे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची केरळमधील थुंबा येथे जाणारी सहल रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ४२ विद्यार्थ्यांची इस्त्रो सहलीसाठी निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह ८ कर्मचारीही सहलीला जाणार होते. ही सहल स्थगित करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या समग्र अंतर्गत जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल हैदराबाद येथे जाणार होती. ही सहलही समितीकडून स्थगित करण्यात आली आहे. या दोन्ही सहलीच्या पुढील तारखा पदाधिकाºयांशी चर्चा करून जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनामुळे इस्त्रोची शैक्षणिक सहल स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:39 PM