लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : गतवर्षीपासून कोरोना संसर्गजन्य आजाराने जगाला ग्रासले आहे. चार महिन्यांत पुन्हा आलेल्या कोरोनाच्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांनीही एक लाखाचा टप्पा पार केला आहे. कोरोनाला हरवीत त्यांनी आपापल्या जीवनात आरोग्याची गुढी उभारली आहे. आहार, व्यायाम, नियमांचे पालन आणि स्वत:च्या आरोग्याबाबत सतर्क राहून त्यांनी कोरोनाला रोखले आहे. १ लाख १ हजार रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवीत बदललेल्या वातावरणातही त्यांनी स्वत:चे आरोग्य सुरक्षित ठेवले आहे.
भारतीय परंपरेत गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीला कडुनिंबाची डहाळी बांधली जाते. यातून एकप्रकारे आरोग्याचा संदेश दिला जातो. गतवर्षीपासून गुढीपाडव्याच्या सणावर कोरोनाचे सावट असले तरी १ लाख १ हजार जणांनी कोरोनावर मात करून आपल्या आरोग्याची गुढी उभारली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांची जीवनशैली बदलली आहे. आहार, व्यायाम, नियमांचे पालन आणि आरोग्यविषयक नियमित तपासणी करण्याबाबत ८० टक्के लोकांमध्ये जागृती आली आहे, असे नगरमधील तज्ज्ञांनी सांगितले. इच्छाशक्ती आणि उपचाराच्या बळावर त्यांनी मात केल्याने कोरोनाची भीती पाळली असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.
-----------------
बरे होण्यासाठीचे पाठबळ...
कोविड सेंटरची उभारणी
रात्रंदिवस राबणारी आरोग्य यंत्रणा
तीन नियमांचे पालन
१४ दिवस क्वारंटाइन राहणे
डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद
ग्रामीण भागात मिळालेल्या सुविधा
सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींकडून पाठबळ
लोकांवर लक्ष ठेवणारी सरकारी यंत्रणा
-----------------
वर्षभरातील स्थिती
एकूण रुग्ण-१, १८,०४५
बरे झालेले रुग्ण-१,०३,७४९
बरे होण्याचे प्रमाण- ८७.८९ टक्के
----------------
एकूण रुग्णांपैकी बरे होण्याचे प्रमाण (२०२१)
जानेवारी--९७.१० टक्के
फेब्रुवारी-९७.९८ टक्के
मार्च-९१.६४ टक्के
एप्रिल-८७.७२ टक्के
------------------
चार महिन्यांतील स्थिती
महिना बाधित बरे झालेले प्रमाण (टक्के)
जानेवारी-२०२१ ३०४८ ३०८७ १०१.२७
फेब्रुवारी-२०२१ ३५०४ ३३३६ ९५.२०
मार्च-२०२१ १८८२२ १३२२५ ७०.२६
एप्रिल-२०२१ १९८०६ १४०८८ ७१.१२
------------
रुग्णांनी आणि आरोग्य यंत्रणेने रात्रंदिवस घेतलेले परिश्रम, नागरिकांनी केलेले नियमांचे पालन, रुग्णांनी वेळेवर उपचार घेतल्याने बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. यापुढेही नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे. यामुळे प्रत्येकाला कोरोनाला रोखणे शक्य होईल. राज्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण सर्वांत चांगले आहे.
-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी