राशीन : मुंबईहून सुनेसोबत राशीन येथे आलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या मृत्युनंतर तिच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांपैकी ११ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तिच्या नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १३ मे रोजी ही महिला आपल्या सुनेसोबत मुंबई (वाशी) येथून राशीनला आली होती. तिला १६ मे रोजी दम्याचा व घशाचा त्रास जाणवू लागल्याने ती नगर जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी गेली होती. मात्र संबधित विभागाने प्राथमिक उपचार करून त्या महिलेस राशीन येथे क्वारंटाईन करण्यास सांगितले होते. पंरतु दोन दिवसांपूर्वी तिला जास्त त्रास जाणवल्याने तीला नगरला हलविण्यात आले होते. मात्र तिचा वाटेतच मृत्यू झाला. मृत्युनंतर तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तिच्या संपर्कात आलेल्या १८ जणांना ताब्यात घेऊन पैकी बारा नातेवाईकांना तपासणीसाठी नगर येथे नेण्यात आले होते. ग्रामपंचायत कर्मचा-यासह पाच जणांना राशीन येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान बारा जणांचे कोरोना अहवाल श्ुक्रवारी रात्री उशीरा हाती आल्याने ११ जण निगेटिव्ह आहेत. सहा वर्षाच्या नातीला बाधा झाली आहे. तर एका जणाचा अहवाल संदिग्ध आहे. आरोग्य प्रशासनाने तो राखून ठेवला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली.दरम्यान कोरोनाबाधित महिलेच्या मृत्युनंतर तिचा वास्तव्यास असणारी वसाहत प्रशासनाने सील केली आहे. पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ग्रामस्थांमध्ये आता ग्रामिण भागात कोरोनाचा फैलाव होत असल्याने तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात भीती कमी झाली आहे.
राशीनच्या ‘त्या’ महिलेच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:08 AM