मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे सर्वच व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला. या संकटातून पतंग निर्मितीचा व्यवसायही सुटला नाही. कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे पतंगांची निर्मिती झाली नाही, तसेच शहरातील विक्रेत्यांनीही यंदा, गुजरात, मुंबई, येवला येथून जास्त माल खरेदी केला नाही. संक्रांतीच्या आठ दिवस आधीच शहरात विविध ठिकाणी पतंग विक्रीचे स्टॉल लागतात. लहान मुलांसह तरुण मोठ्या प्रमाणात पतंग व मांजाची खरेदी करून पतंगोत्सव साजरा करतात. यंदा कोरोनाच्या भीतीमुळे मैदाने व इमारतींच्या गच्चीवर पतंग उडविणारी गर्दी दिसून येत नाही, त्यामुळे विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. संक्रांतीच्या एक दिवस आधी व संक्रांतीच्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल, अशी विक्रेत्यांना अशा आहे. यंदा बाजारात नेहमीप्रमाणेच कार्टून व रंगीबेरंगी पतंगांना मागणी आहे. ४ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत पतंग उपलब्ध आहेत, तसेच मांजा २५ ते ३०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
चायना मांजावर पोलिसांची नजर
बंदी असतानाही धोकादायक चायना मांजा काही पतंग विक्रेत्यांकडून विकला जात असल्याने पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठ दिवसांत शहरात विविध ठिकाणी छापे टाकून चायना मांजा जप्त करत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
-------------------------------------------------------------
संक्रांतीनिमित्त दरवर्षी पतंगाला मोठी मागणी असते. यंदा कोराेनामुळे ही मागणी घटली आहे. लहान मुलांचा पतंगबाजीचा उत्साह मात्र कायम आहे. कार्टूनचे चित्र व रंगीबेरंगी पतंगांची मुलांकडून खरेदी केली जात आहे.
- दत्तात्रय दहिफळे, पतंग विक्रेते
फोटो १३ पतंग
ओळी- स्टॉलवर पतंग खरेदी करताना लहान मुले