अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असून त्या अनुषंगाने शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ३४५० शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या होत्या.
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत एकूण १२०९ शाळा असून त्यावर सुमारे १० हजार शिक्षक, तर ६ हजार शिक्षकेतर कर्मचारी आहेत. या सर्वांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. एकूण दहा हजार शिक्षकांपैकी शनिवारपर्यंत ३४५० शिक्षकांच्या कोविड चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु त्यात किती शिक्षक पॉझिटिव्ह आढळले याची आकडेवारी अद्याप शिक्षण विभागाकडे आलेली नाही.
आता रविवार एकच दिवस चाचणीसाठी शिल्लक असून सोमवारपासून प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या कधी होणार असा प्रश्न आहे.